लातुरात मंगळवारी माणुसकीचा जागर कार्यक्रमाचे आयोजन : पांडुरंग कोते रेड्डी

Monday, December 10, 2018

लातूर : एकता निराधार संघ महाराष्ट्र , शिक्षण फाऊंडेशन व धाडस ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. ११ डिसेंबर २०१८ रोजी लातूरमध्ये प्रथमच हजारो अनाथांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या एकता निराधार संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत ' माणूसकीचा जागर ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष पांडुरंग कोते रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.



स्वतः अनाथ असूनही सागर रेड्डी यांनी आपल्यासारख्या अनाथांच्या जीवनात नवचैतन्य फुलविण्याचे काम मागच्या अनेक वर्षांपासून सुरु केले आहे. १८ वर्षांवरील अनाथ, निराधार मुले - मुलींना नोकऱ्या मिळवून देणे , त्यांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणे अशा प्रकारचे कार्य ते सातत्याने करीत असतात. आतापर्यंत केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर अंधार प्रदेश, कर्नाटक आदी विविध भागांतील २७०० अनाथ मुलांचे जीवन घडविण्याचे काम त्यांच्या एकता निराधार संघाच्या माध्यमातून केले गेल्याचे सांगून पांडुरंग रेड्डी पुढे म्हणाले की, मंगळवारी सायंकाळी चार वाजता दयानंद सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे राहणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर , पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सागर रेड्डी अनाथालयातील मुलांच्या जीवनावरील अनुभव व्याख्यानाच्या रूपाने कथन करणार आहेत. त्यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी शहर परिसरातील तरुण वर्ग, महाविद्यालयीन युवक - युवती व समाजाच्या सर्वच स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही रेड्डी यांनी यावेळी बोलताना केले. १८ वर्षांवरील अनाथ मुलांची जबाबदारी शासनही घेत नाही. अशा मुलांसाठी कार्य करणारी ही संस्था असून पनवेल येथील वस्तिगृहात ह्या अनाथ मुलांचा सांभाळ केला जातो. अशाच प्रकारचे वसतिगृह आगामी काळात लातुरातही सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनाथ मुलांसाठी ही संस्था कार्य करीत आहे. त्याबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी गजानन बोळंगे यांचे शिक्षण फाऊंडेशन कार्यरत असून अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च ह्या फाऊंडेशनच्या माध्यमातून केला जात असलयाचे रेड्डी यांनी सांगितले. यावेळी या उपक्रमांसाठी सहकार्य करणाऱ्या डॉ. शिवाजी काळगे , पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे, सहा. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, डॉ. हणमंत किनीकर , डॉ. ज्ञानेश्वर पांचाळ, डॉ. गणेश पन्हाळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास शहर व परिसरातील युवक - युवती, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी एकता निराधार संघाचे सचिव रणजित मुंडे, कोंडीराम काळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 


Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment