
मुंबई, : घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जालना जिल्हा (ग्रामीण) व परभणी शहरातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प व अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजना या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण औरंगाबादचे मुख्य अभियंता विजय जगतारे, जालना विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सिंह, जालना नगरपरिषदचे मुख्याधिकारी संतोष म. खांडेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. लोणीकर म्हणाले, जालना जिल्ह्यात (ग्रामीण) घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातही कामे करावे. चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गावांसाठी घनकचरा व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास चंद्रभागा नदी दूषित होणार नाही. त्यामुळे भाविकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळेल.
योजना राबविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम गतिमान करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जालना जिल्हा, नगर परिषद जालना व परभणी शहरातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याबाबत, तसेच जालना जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी बैठकीत जालना जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी विद्युत पंप सौर ऊर्जेवर चालविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
श्री. लोणीकर म्हणाले, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत आवश्यक असलेल्या विंधन विहिरीवर सौर पंप बसवून डोंगरी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रचलित धोरणानुसार जालना जिल्ह्यात सौर पंप बसवून सौर ऊर्जेवर आधारित नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment