त्यांना माल्ल्याचाही वाल्मिकी करायचा आहे - अशोक चव्हाण

Saturday, December 15, 2018


मुंबई : अनेक गुंडांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना पावन करून घेणारे व आम्ही वाल्याचा वाल्मिकी करतो असे समर्थन करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता गुंडांसोबतच विजय माल्ल्यासारख्या कर्जबुडव्या उद्योगपतींचे समर्थन करत आहेत. हा विजय माल्ल्याचाही वाल्मिकी करण्याचा प्रयत्न आहे. अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्तीचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या माल्ल्याला चोर म्हणणे चुकीचे आहे. असे वक्तव्य गडकरी यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून खा. चव्हाण म्हणाले की, गडकरी यांनी यापूर्वीही आम्ही गुंडाना आमच्या पक्षात प्रवेश देऊन वाल्याचा वाल्मिकी करतो असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता विजय माल्ल्याचे समर्थन करून त्यांनाही भाजपात प्रवेश दिला जाणार आहे का? असा सवाल करून नाहीतरी विजय माल्ल्या दोनवेळा भाजपच्या मदतीनेच खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेला होता याची आठवण करून दिली.
सुप्रिम कोर्टाच्या नोटीसीनंतर मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का? पारदर्शक कारभाराच्या व नैतिकतेच्या गप्पा मारणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती लपवली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीने मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शकतेचा मुखवटा गळून पडला असून त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment