अधीक्षक अभियंता पदावर नियुक्ती देण्याचा हालचाली
नांदेड/ प्रतिनिधी: विविध घोटाळ्यांमध्ये गुन्हे दाखल असणारे , जामिनावर मोकळे असणारे तसेच सध्या मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत असणारे अविनाश धोंडगे यांना नांदेड सार्वजनिक बांधकाम मंडळात अधीक्षक अभियंता पदावर नियुक्ती देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे .मुळात भ्रष्ट अधिकारी म्हणून प्रसिद्ध असणारे धोंडगे यांच्याविरोधात चार एफआयआर दाखल आहेत .काही प्रकरणात धोंडगे यांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली आहेत. एका प्रकरणात अटक झाल्यानंतर अविनाश धोंडगे जामिनावर बाहेर आहेत. असे असतानाही धोंडगे यांना नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पद पुन्हा बहाल करणे म्हणजे राज्य शासनाची विनाशकाले विपरीत बुद्धि ठरणार आहे.
स्वच्छ प्रशासन राबविणारे मुख्यमंत्री म्हणून आपली ओळख प्रस्थापित करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोंडगेना पुन्हा नांदेड येथे नियुक्ती दिली तर राज्य शासनाची प्रतिमाही मलीन होणार आहे .अविनाश धोंडगे यापूर्वीही नांदेड येथे कार्यरत होते .2006 ते 2011 या कालावधीत नांदेड जिल्हा परिषद व नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी काम केले.
याचदरम्यान झालेल्या गुरु-ता-गद्दी कार्यक्रमात धोंडगे यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे आरोप झालेले आहेत. या संदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. निकृष्ट कामे करणे, अधिकाराचा दुरुपयोग करणे, नियमबाह्य कामे करणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. अशाच प्रकारातून नांदेड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहेत .भाग्यनगर पोलिस ठाण्याअंतर्गतही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेले एक प्रकरण उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात जाऊन परत आले आहे .न्यायालयाने प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत. डांबर घोटाळ्यातही धोंडगे यांचे नाव घेतले जात आहे .असे असतानाही त्यांना पुन्हा एकदा नांदेड येथील अधीक्षक अभियंता पद देणे म्हणजे त्यांनी आजपर्यंत केलेल्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचाच प्रकार ठरणार आहे .
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वीय सहायकाने धोंडगे यांना पुन्हा नांदेडला पाठविण्यास होकार देण्याचा सल्ला मंत्र्यांना दिला आहे .विशेष म्हणजे हा सल्ला मानून पारदर्शक व स्वच्छ कारभार करणारे मंत्री म्हणून परिचित असणारे चंद्रकांत पाटील यांनीदेखील धोंडगे यांना नांदेड येथे पाठविण्यास होकार दिला असल्याचे समजत आहे. धोंडगे यांच्या नांदेड येथे बदलीची फाईल सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात असल्याचे समजते .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ चारित्र्याचे आणि पारदर्शक कारभारासाठी प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत .भ्रष्ट अधिकाऱ्यांना ते कधीही पाठीशी घालत नाहीत. यामुळेच फडणवीस यांच्या निर्णयाबद्दल कोणालाही कसलाही आक्षेप असत नाही. तरीदेखील धोंडगे यांनी प्रयत्न चालवले आहेत .यामुळे धोंडगे यांच्या सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नांदेड येथे बदली केली तर त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे .अविनाश धोंडगे यांनी जेथे - जेथे काम केले त्या प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचारच केलेला आहे .हिंगोली येथेही त्यांनी अशीच भ्रष्ट कामे केलेली आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना अभय देऊ नये, त्यांची नांदेड येथे बदली करू नये अशी मागणी पुढे येत आहे. अधिकाऱ्यांना त्यांच्या अपेक्षित ठिकाणी नियुक्ती देणे हा देखील भ्रष्टाचाराला चालना देण्याचा प्रकार ठरणार आहे. शिवाय नांदेड येथे नियुक्ती झाली तर धोंडगे हे यापूर्वी केलेल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाने याप्रकरणी निर्णय घेऊन धोंडगे यांना नांदेड पासून दूरच ठेवावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
No comments:
Post a Comment