दुष्काळ निवारणासाठी 8 हजार कोटींची तातडीने मदत करण्याची केंद्राकडे मागणी

Friday, December 7, 2018

नवी दिल्ली, दि. ७: राज्यातीलविविध भागात गंभीर झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता राज्याने ७ हजार ९६२ कोटी ६३ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे सादर केला आहे. ही मदत लवकरात-लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केली.

दुष्काळासह राज्यातील विविध विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्यात चर्चा झाली. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्याच्या भेटीवर आले असल्याचे सांगून राज्यातील दुष्काळ निवारणासाठी त्वरित मदत उपलब्ध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. राज्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार सकारात्मकअसून लवकरच आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे श्री. मिश्रा यांनी सांगितले. राज्याने सादर केलेल्या मदतनिधीच्या प्रस्तावाची प्रतही श्री. मिश्रा यांना देण्यात आली.यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अतिरिक्त ६ लाख घरांची मागणी
राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला हक्काचा निवारा मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) मोठ्या प्रमाणात घरांची बांधणी सुरू आहे. मात्र, सर्वांसाठी घरे उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी राज्याला आणखी घरांच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यामुळे अतिरिक्त ६लाख घर बांधणीच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या योजनेला गती मिळावी म्हणून राज्यशासन स्वत:ची जागा नसलेल्या लाभार्थ्यांस ५०० चौरस फुट जागा खरेदीसाठी ५०हजार रूपयांचे अनुदान देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment