समाजवादी नेते डॉ.द्वारकादास लोहिया अनंतात विलीन

Saturday, November 24, 2018

अंबाजोगाई (प्रतिनिधी) ज्येष्ठ समाजवादी नेते,राष्ट्रसेवा दलाचे व मानवलोक संस्थेचे संस्थापक कार्यवाह डॉ.द्वारकादास लोहिया यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात मानवलोकच्या मुख्यालयात शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी राज्यातील अनेक राजकीय,सामाजिक, साहित्य क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावत डॉ.लोहिया यांना श्रद्धांजली अर्पण केली.

शनिवार,दि.24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता डॉ.लोहिया यांच्या निवासस्थानापासुन निघालेली अंत्ययात्रा राजीव गांधी चौक, शिवाजी चौक,गुरूवार पेठ,मंडी बाजार,पाटील चौक,बसस्थानक, सावरकर चौक,तथागत चौक मार्गे अडीच वाजता मानवलोकच्या मुख्यालयात पोहोंचली यायनंतर राज्यातून आलेल्या मान्यवरांनी डॉ.लोहिया यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, अमर हबीब,आ. संगीताताई ठोंबरे, अफार्मचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, नॅचरल चे बी.बी.ठोंबरे,रमेशराव आडसकर,दै.प्रजापञचे संपादक सुनिल क्षीरसागर,समाजवादी नेते अण्णासाहेब खंदारे,माजी मंञी पंडीतराव दौंड,नंदकिशोर मुंदडा, राजेसाहेब देशमुख,माजी आ.अ‍ॅड.उषाताई दराडे,अतुल देवळगावकर,अनिल महाजन,माजी आ.सुनिल धांडे,दत्ता बारगजे,रामराव जाधव, प्रा.मंगलताई खिवंसरा, डॉ.अहंकारी, प्रा.चंद्रकला भार्गव, डॉ.भारतभुषण क्षीरसागर,माजी आ.बाजीराव जगताप आदींनी डॉ.लोहिया यांच्या कार्यावर प्रकाश टाकत श्रद्धांजली अर्पण केली.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांनी व्टिटरवरून मानवलोक संस्थेद्वारे उपेक्षीत व दुष्काळ ग्रस्तासाठी झटणारे,मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून परितक्त्यांना आधार देणारे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ.द्वारकादास लोहिया यांच्या निधनाने एका खंद्या सामाजिक कार्यकर्त्याला आपण मुकलो असल्याच्या भावना व्यक्त केल्या.तर बीडच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी समाजामधील वंचित पिडीत गोर-गरीबांच्या उथानासाठी आयुष्यभर कष्ट घेणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ.द्वारकादास लोहिया यांच्या निधनामुळे सर्वसामान्य माणसाचा आधारवड हरपला आहे.त्यांच्या निधनामुळे बीड जिल्हा एका थोर समाजसेवकाला मुकला असून जिल्ह्याची फार मोठी हानी झाली आहे.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मानवलोकचे संस्थापक डॉ.द्वारकादास लोहिया उर्फ बाबुजी यांच्या निधनाने एका ज्येष्ठ समाजसेवकास आपण मुकलो आहोत.आपल्या कार्यातून मानवलोक सोबतच अंबाजोगाई आणि बीड जिल्ह्याचे नाव मोठे केले.आपले संपुर्ण आयुष्य त्यांनी समाजापती समर्पित केले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.तर खा.प्रितमताई मुंडे आदींनी पाठवलेल्या शोकसंदेशाचे अ‍ॅड.संतोष पवार व अभिजीत जोंधळे यांनी वाचन केले.

तर मंत्री महादेव जानकर यांनी दुरध्वनीद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.डॉ.लोहिया यांची अंतिम इच्छा माझे अंत्यसंस्कार करण्यात येवू नयेत.यामुळे निसर्गाची हानी होते.त्यांचे निसर्गप्रेम ओळखून त्यांच्या कुटुंबियांनी डॉ.लोहिया यांचा दफणविधी मोठ्या शोकाकुल वातावरणात करण्यात आला.यावेळी अनेकांना अश्रु अनावर झाले.यावेळी माजी आमदार पृथ्विराज साठे, डॉ.अंजली घाडगे,संपादक प्रा.रामेश्वर बद्दर,सर्वोत्तम गावरस्कर आदींसहीत सर्वच क्षेञातील मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment