हिंगोली / प्रतिनिधी
एकेकाळी एकमेकांचे सहकारी असलेले कॉंग्रेसचे खा. राजीव सातव व भाजपा नेते माजी खा.शिवाजीराव माने यांनी शुक्रवारी हमसफर रेल्वेगाडीच्या स्वागतासाठी हजेरी लावली. ते दोघेही एकमेकांसमोर आल्यानंतर दिलखुलास हस्तांदोलन झाले आणि उपस्थितांच्या चेहऱ्यावरही हसू फुलले. मात्र या फोटोने फेसबूक, वॉटसऍपसारख्या सोशल माध्यमावर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय चर्चा लढवित आहेत.
2009 च्या विधानसभेला कळमनुरी मतदार संघातून सध्याचे विद्यमान खा. राजीव सातव यांनी विधानसभेसाठी तयारी चालविली होती. त्यानंतर पक्षानेही सातवांना कळमनुरी विधानसभेचे उमेदवारी दिल्यानंतर त्यांना कळमुनरी मतदार संघातील मतदारांनी विजयही मिळवून दिला. त्या विजयामागे तत्कालीन कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष माजी खा. शिवाजीराव माने यांचा सिंहाचा वाटा होता हे सर्वश्रुत आहे. पण त्यानंतर खा. राजीव सातव व माजी खा. शिवाजीराव माने यांच्यात राजकीय मतभेद झाली. मा.खा.माने यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेस ते भाजपा व्हाया राष्ट्रवादी असा प्रवेश केला. आणि दोघांच्याही भाषणात या ना त्या कारणावरून राजकीय व्यासपीठावर टिकेची झोड उठवली जात होती. आजही हे चित्र असताना शुक्रवारी हुजूर साहिब नांदेड ते जम्मु तावी हमसफर या नव्याने सुरू झालेल्या रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी माजी खा. शिवाजीराव माने व खा. राजीव सातव एकत्र आले होेते.
त्यानंतर त्यांच्या दिलखुलासपणे झालेल्या हस्तआंदोलनाने अनेकांच्या चेहऱ्यावर हसु फुलले तर अनेकांच्या भुवय्याही उंचावल्या. हा फ ोटो सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी या फोटोला धरून अनेक तर्क वितर्क लढविले. हा फोटो फेसबुकवर टाकून भावी खासदार कोण सांगा बिनधास्त अशी पोस्टही टाकली. ही भेट केवळ नव्या रेल्वेगाडीच्या स्वागतासाठी असली तरी गेल्या कित्येक वर्षापासून या दोन दिग्गजांचा हिंगोलीकरांना असा फोटो पहायला मिळाला नसल्याने हा फोटो राजकीय गोटाला सुखावून गेला. एकंदरीत शुक्रवारी आजी-माजी खासदारांच्या हस्तआंदोलनाचा फोटोच फोटो ऑफ द डे ठरला.

No comments:
Post a Comment