माजी खा. सुभाष वानखेडे यांच्या घरवापसीचे संकेत

Sunday, October 7, 2018

वरिष्ट पातळीवर गाठी-भेटी वाढल्या, आ.मुंदडा, आष्टीकरांच्या भुमिकेकडे लक्ष 

हिंगोली / ज्ञानेश्वर लोंढे 
हदगाव विधानसभेचे शिवसेनेकडून तीन वेळेस आमदार राहिलेले तसेच हिंगोली लोकसभेचे खासदारकी भुषविलेले माजी खा. सुभाष वानखेेेडे यांच्या घरवापसीचे संकेत मिळत आहेत. मागील महिन्याभरापासून त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या अधुन मधून येत असल्याने लोकसभा मतदार संघात त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वरिष्ठ पातळीवर माजी खा. वानखेेडे यांच्या गाठी-भेटी वाढल्या असल्या तरी त्यांच्या सेना प्रवेशास हदगावचे आमदार नागेश पाटील आष्टीकर व वसमतचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा हे होकार देतील काय? यावर माजी खा. वानखेडे यांच्या शिवसेना प्रवेशाचे भवितव्य असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून माजी खा. सुभाष वानखेडे यांची ओळख होती. विधानसभेत पक्षाचे प्रतोदपद वानखेडे यांनी योग्य रित्या हाताळले. बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत सैनिक म्हणून वानखेडे यांची ख्याती होती. त्याचमुळे ते हदगाव विधानसभा मतदार संघातून तीन वेळेस सलग विजयी झाले. माजी मंत्री सुर्यकांता पाटील यांचा वानखेडे यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघात पराभव करून सेनेत दरारा वाढविला होता. परंतू, मध्यंतरीच्या काळात वसमतचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा व कळमुनरीचे माजी आमदार गजाननराव घुगे यांच्यातील अंतर्गत वादाचा परिणाम त्यांना गत लोकसभा निवडणुकीत भोगावा लागला. मोदी लाटेतही विद्यमान खा. राजीव सातव यांनी वानखेडे यांचा पराभव केल्यानंतर वानखेडे यांनी सेनेला सोडचिठ्ठी देत भाजपाची कास धरली होती.

 भाजपकडून हिंगोली लोकसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तसेच शिवसेनेकडे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार सध्या तरी नसल्याने वानखेडे यांनी सेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे जवळीक साधल्याची चर्चा मागील सहा महिन्यांपासून मतदार संघात झडत आहे. वानखेडे यांनी भाजपच्या मोजक्याच कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. त्यांचा हिंगोली लोकसभा मतदार संघात भाजपकडून सक्रीय सहभाग दिसत नसल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला अधिक बळ मिळत आहे. आठवडाभरापुर्वीच मुंबई येथे शिवसेनेतील काही बड्या नेत्यांच्या भेटी माजी खा. वानखेडे यांनी घेतल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे. वरिष्ठ वानखेडे यांच्या सेना प्रवेशास सकारात्मक असले तरी त्यांची मुळ अडचण हदगाव व वसमतमधील स्थानिक सेना आमदार राहणार आहे.

शिवसेनेकडून लोकसभेला वसमतचे आमदार जयप्रकाश मुंदडा, उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, डॉ. बी.डी. चव्हाण इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेत माजी खा. वानखेडे यांच्या पक्ष प्रवेशाचे संकेतही अनेक दिवसांपासून मिळत असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत मोठ्या राजकीय उलथापालथी होतील, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचे माजी खा. वानखेडे यांच्यासोबत असलेले संबंध सर्वश्रुत आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी जिल्हाप्रमुखांकडून अडचण नसली तरी आ. आष्टीकर व मुंदडा यांच्या भुमिकेवर माजी खा. वानखेडे यांची घरवापसी निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment