उस्मानाबाद,दि.७-
खरीप हंगाम २०१७ मधील सोयाबीन पिकाच्या विम्यापासून वंचित असलेल्या उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील जवळपास ७५ हजार शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा,यासाठी पालकमंत्री अर्जून खोतकर आणि जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले असून याची दखल घेत संबंधित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंत्रालयातील संबंधित अधिकार्यांना दिले आहेत.
उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी जिल्ह्यातील खासदार प्रा.रविंद्र गायकवाड तसेच सर्वच आमदारांनी या बाबीचा नियमित पाठपुरावा सुरू ठेवला होता.
पिक कापणी प्रयोगातील त्रुटीमुळे या दोन तालुक्यातील शेतकरी सोयाबीन पिक विम्यापासून वंचित राहिले असून त्यांना विमा मिळालाच पाहिजे,अशी आग्रही भूमिका त्यांनी नागपूर येथील पावसाळी अधिवेशानादरम्यान विधानभवनातील आयोजित बैठकीत मांडली होती. याच बैठकीमध्ये एक आठवड्यात पिक विमा देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याचे आश्वासन महसूल व कृषी मंत्री चंद्रकांतदादा पाटील दिले होते.
मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या वर्धापनदिनी अायोजित कार्यक्रमाच्या वेळी आमदार राणाजगजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानेही पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. त्याचवेळी शेतकर्यांच्या भावनांची दखल घेत पालकमंत्री श्री.खोतकर यांनी महसूल व कृषी मंत्री चंद्रकांत दादा पाटील व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी तात्काळ संपर्क साधून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांच्या या मागणीबाबत चर्चा केली. याची तातडीने दखल घेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि महसूल व कृषी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून रु.५६.६८ कोटी चा प्रस्ताव दि.८ आॅक्टोबरपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश संबंधिताना दिले.
शासनाने याबाबत सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी शासनाचे आभार मानले असून आता पुढील कार्यवाहीदेखील लवकर व्हावी,यासाठीही पाठपुरावा सुरु राहणार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी येथील शेतकर्यांसाठी दाखविलेल्या एकीसाठी तसेच कार्यतत्परतेसाठी पालकमंत्री श्री.खोतकर यांनी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड,सर्वश्री आमदार राणाजगजितसिंह, ज्ञानराज चौगुले,सुरजितसिंह ठाकूर, राहुल मोटे यांसह सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानून यापुढेही असेच एकत्रित काम करून या जिल्ह्यातील शेतकर्यांच्या विकासासाठी पुढील वाटचाल सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment