लातूर / प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून खास लातूरकरांसाठी र्अटल महाआरोग्य शिबीर आयोजित केले आहे. दि. 7 ऑक्टोबर रोजी होणार्या आरोग्य सेवेच्या या कुंभ मेळ्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे, समाजातील गरजुंना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
अटल महाआरोग्य शिबीरासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वीयसहाय्यक अभिमन्यू पवार, अरविंद पाटील निलंगेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता राजाराम पवार, भाजप शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, नागनाथ निडवदे उपस्थित होते.लातूर येथील अटल महाआरोग्य शिबीराचे तयारी खुप दिवसांपासून सुरू आहे. सर्वांच्या सहाकार्यातून शिबीर यशस्वी होणार आहे, असे सांगून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, संत तुकाराम इंग्लिश स्कुल शाळेसमोर असलेल्या अटल मैदानात शिबीर होणार आहे. रूग्णांची पुर्व तपासणी झाली नसले तरीही शिबीराचा लाभ घेता येईल. शिबीर एक दिवसाचे नाही संबंधित रूग्णांवर पुढच्या दोन महिन्यांत पुर्ण उपचार केले जातील, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
नामवंत डॉक्टर मंडळी
शासनाच्या म.फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेणारे लातूर जिल्ह्यातून 35 हजार लाभार्थी आहेत. त्या दृष्टीने लातूर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती देवून पालकमंत्री म्हणाले, अटल महाआरोग्य शिबीरासाठी नामवंत डॉक्टर मंडळी येणार आहेत. ज्या डॉक्टरांना भेटण्यासाठी 15 दिवसांपुर्वी अपॉईंटमेंट घ्यावी लागते असे डॉ. नीर बापट, डॉ. लकडावाला, डॉ. पांडा, डॉ. लहाने रूग्णांवर उपचार करणार आहेत. शिबीर यशस्वी व्हावे यासाठी 10 हजार स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. असेही ते म्हणाले.
पत्रकारांच्या प्रश्नांना उतर देताना पालकमंत्र्यांनी सर्व उपचार रूग्णालयात औषधांची कमतरता भासणार नाही, लातूरचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पीटल पुर्ण होत आले आहे. ग्रामीण रूग्णालयासाठी जागा निश्चित झाली असून लवकरच काम सुरू होईल. तसेच अटल महाआरोग्य शिबीरात स्थानिक डॉक्टर, रूग्णालयांचा सहभाग असणार आहे, असे सांगितले.
मुख्यमंत्र्यासह मान्यवर येणार
अटल महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटन निमीत्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दिपक सावंत यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मान्यवर येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
10 तारखेनंतर आनंदाची बातमी
लातूरच्या रेल्वी बोगी प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष सुरूवात नवरात्री दरम्यान होईल, हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या चेकलिस्टमध्ये असल्याने पाठपुरावा होत आहे. हे सांगताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येत्या 10 ते 20 ऑक्टोबर दरम्यान, लातूरला आणखी एक आनंदाची बातमी कळणार असल्याचे सुचित केले. एखादा मोठा प्रकल्प किंवा मंत्री मंडळ विस्तारात पालकमंत्र्यांना पदोन्नतीहीच आनंदाची बातमी असावी, असा कयास लावला जात आहे. ती आनंदाची बातमी कोणती याकडे आता समस्त लातूरकरांचे लक्ष लागले आहे.
दानशुरांनी मदत करावी-अभिमन्यू पवार यांचे आवाहन
लातूरला लोकसहभागातून अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील उद्योजक व्यापारी, दानशुर व्यक्तींनी पाण्याचे टँकर, पाणीबॉटल, गहु, तांदुळ, तेल स्वरूपात मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे स्विय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून हे आरोग्य शिबीर साकारतंय असे बोलून ते म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून सामान्य लोकांना 2 लाखापर्यंत मदत केली जाते. हे आतापर्यंत कोणासही ठावूक नव्हते. परंतू, चार वर्षात सर्वात जास्त निधी लातूर जिल्ह्याला प्राप्त झाला. महाआरोग्य शिबीराची मुळ संकल्पना ना.गिरीष महाजन यांची आहे. आतापर्यंत राज्यात 17 मोठी शिबीरे झाली. लातूरचे हे अठरावे शिबीर आहे. पालकमंत्र्यांच्या आग्रहातून हे शिबीर लातूरला मिळाल्याचे अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment