नांदेड/प्रतिनिधी- बहुप्रतीक्षेत असलेली नांदेड - दिल्ली विमान सेवा येत्या 28 ऑक्टोबर पासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एअर इंडियाच्या या विमानसेवेने गुरुद्वारा दर्शनासाठी येणार्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.
नांदेड शहरातल्या जगप्रसिद्ध गुरुद्वारा दर्शनासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून असंंख्य भाविक मोठ्या संख्येने येतात. विशेषतः पंजाब, चंदिगढ ,दिल्ली भागातून येणार्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. या भाविकांना प्रवासासठी केवळ रेल्वे किंवा खाजगी वहान हेच प्रवासाचे साधन आहे. काही दिवसापूर्वी अमृतसर - नांदेड विमानसेवा सुरू झाली. आठवड्यातून तीन दिवस चालणार्या विमानसेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय नांदेडहून मुंबई तसेच हैदराबाद कडे जाणारी विमाने ही हाउसफुल आहेत. प्रवाशांंची वाढती संख्या लक्षात घेऊन नांदेड दिली अशी विमानसेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात येत होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच खा.अशोक चव्हाण यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. गुरुद्वारा बोर्डानेही नांदेड - दिल्ली विमान सेवा सुरू करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 28 ऑक्टोबर पासून एअर इंडिया देशातल्या वेगळ्या मार्गांवर नवीन विमानसेवा सुरू करणार आहे, त्यात नांदेड - दिल्ली चा समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीच्या काळात आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा मिळणार आहे. प्रतिसाद मिळाला तर हीच सेवा नियमित करण्याबाबत एअर इंडियाचे अधिकारी सकारात्मक असल्याची माहिती मिळाली.
नांदेड - अमृतसर पाठोपाठ आता नांदेड - दिल्ली विमानसेवा सुरू झाल्याने भाविकांची चांगली सोय होणार आहे. विमानसेवा सुरू होणार असली तरी, नांदेड ते जम्मु नवीन रेल्वे एक्सप्रेस सुरु करावी अशी मागणी समोर आली आहे. सर्वसामान्यांंना परवडणार्या तसेच वेगवेगळ्या भागातील सामान्य माणसाला रेल्वेसेवेचा लाभ होईल. सध्या नांदेडहून दिल्लीला थेट जाण्यासाठी केवळ सचखंड एक्सप्रेस हा एकमेव पर्याय आहे. या रेल्वेचे आरक्षण तीन -तीन महिने अगोदर बुक होते, त्यामुळे नांदेड - जम्मू अशी नवी एक्सप्रेस सुरू करावी अशी भाविकांची मागणी आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment