मुकेश अंबानी सलग देशात सर्वात श्रीमंत व्यक्ती

Saturday, October 6, 2018

नवी दिल्ली: 
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांनी सलग अकराव्या वर्षी आपलं स्थान अबाधित राखलं आहे. फोर्ब्जनं जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत ४७.३ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीचे धनी असलेल्या अंबानी यांनी पहिला क्रमांक पटकावला असून एका वर्षात सर्वात जास्त संपत्ती मिळवणाऱ्या व्यक्तिंच्या यादीतही मुकेश अंबानी सर्वोच्च स्थानी आहेत. 

यंदा अंबानींच्या संपत्तीत ९.३ अब्ज डॉलरची भर पडली आहे. त्यामुळे ते यंदा सर्वाधिक कमाई करणारे भारतीय देखील झाले आहेत. फोर्ब्स इंडियाच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत ही माहिती देण्यात आली आहे. या यादीत विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. त्यांची संपत्ती दोन अब्ज डॉलर वाढून २१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आर्सेलर मित्तल कंपनीचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांची संपत्तीही यंदा १.८ अब्ज डॉलर वाढली असून, एकूण संपत्ती १८.३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ते भारतीय श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत, तर हिंदुजा बंधू १८ अब्ज डॉलर संपत्तीसह चवथ्या आणि पालनजी १५.७ अब्ज डॉलर संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत.

 पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीत शिव नाडर (१४.६ अब्ज डॉलर), गोदरेज कुटुंब (१४ अब्ज डॉलर), दिलीप संघवी (१२.६ अब्ज डॉलर), कुमार मंगलम बिर्ला (१२.५ अब्ज डॉलर), आणि गौतम अदानी (११.६ अब्ज डॉलर) यांचा समावेश आहे. सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या या यादीत चार महिलादेखील आहेत. देशातील पहिल्या शंभर श्रीमंतांपैकी ११ व्यक्तींच्या संपत्तीत एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तसेच पहिल्या १०० श्रीमंतांची एकूण संपत्ती वाढून यंदा ४९२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे..

No comments:

Post a Comment