भाजप शिवसेनेला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय जनसंघर्ष थांबणार नाहीः खा.अशोक चव्हाण

Thursday, October 4, 2018

फैजपूर : प्रतिनिधी
काँग्रेसने लोकशाही व धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करून या देशात राष्ट्रीय एकात्मता जोपासली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्ष जातीयवादाचे व धार्मिक द्वेषाचे विष पसरवून राजकीय फायद्यासाठी देश तोडण्याचे काम करत आहेत, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.

केंद्रातील व राज्यातील भाजप शिवसेनेच्या नाकर्त्या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली आहे. आज जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे या यात्रेच्या दुस-या टप्प्याचा शुभारंभ झाला. यावेळी आयोजित विशाल जनसभेला मार्गदर्शन करताना खर्गे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

या सभेला मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले की, फैजपूरची ऐतिहासीक भूमी उर्जा देणारी आहे. फैजपूरच्या अधिवेशनाने देशाला दिशा दिली व जुलमी इंग्रज सरकारच्या तावडीतून देशाला मुक्त केले. तसाच प्रकारे भाजपला सत्तेवरून दूर केल्याशिवाय आता हा जनसंघर्ष थांबणार नाही. देशोतली लोकशाही व्यवस्था मोडीत काढून हुकुमशाही आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गांधीजींच्या चरख्यासोबत फोटो काढणा-यांच्या पूर्वजांचे स्वातंत्र्यलढ्यात काय योगदान आहे? असा सवाल करून राजकीय फायद्यासाठी भाजप महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावांचा वापर करत आहेत. त्यांच्या विचारांशी भाजपचा काही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांच्या खोट्या आश्‍वासनामुळे त्रस्त झालेली जनता आता विचारतेय क्या हुआ तेरा वादा? पण मुख्यमंत्र्यांकडे याचे काही उत्तर नाही. भाजपचा भ्रष्ट चेहरा आता राज्यातील जनतेसमोर आला असून भाजपला पराभूत केल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे खा. चव्हाण म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. नसीम खान, हर्षवर्धन पाटील, खा. हुसेन दलवाई, आ. निर्मला गावीत, आ. भाई जगताप युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment