नवख्या हाँगकाँगने भारताला विजयासाठी झुंजवले

Wednesday, September 19, 2018


दुबई  : भारतीय संघाने आशिया चषकाच्या हाँगकाँग विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात २६ धावांनी निसटता विजय मिळवला आहे. भारताच्या तुलनेत दुबळ्या मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगच्या संघाने भारताच्या २८६ धावांच्या आव्हानाचा नेटाने पाठलाग केला. पण ५० षटकांच्या अखेरीस हाँगकाँगला ८ बाद २५९ धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी भारताने २६ धावांनी विजयाची नोंद करत स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या हाँगकाँगने विजयासाठी भारताला चांगलेच झुंजवले. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्या अगोदर भारतीय संघाला सूचक इशारा मिळाला आहे. 

अंशुमन रथ आणि निझाकत खान यांनी पहिल्या षटकापासून धावफलक हलता ठेवला. परिणामी हाँगकाँगचे अर्धशतक ९.२ षटकात धावफलकावर लागले. खानने ४५ चेंडूत तर कर्णधार अंशुमनने ७५ चेंडूत अर्धशतके झळकावली. या दोघांनी १०९ चेंडूत शतकी भागीदारी रचली. कुलदीप यादवने धोकादायक होणाऱ्या या भागीदारीला फोडण्यात यश मिळवले. त्याच्या गोलंदाजीवर कर्णधार रथ एक्स्ट्रा कव्हरला रोहित शर्माच्या हाती झेल सोपवत माघारी परतला. रथने ४ चौकार व १ षटकारने ७३ धावा काढल्या. कर्णधार रथ परतल्यानंतर पुढच्या षटकात खानही बाद झाला. त्याच्या ९२ धावांच्या खेळीत १२ चौकार व १ षटकाराचा समावेश होता. खेळपट्टीवर स्थिरावलेले रथ व खान तंबूत परतल्यानंतर धावगतीचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नात हाँगकाँगचे फलंदाज अपयशी ठरले. भारताकडून एकदिवसीय सामन्यात पदापर्ण करणारा खलील अहमद सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३ बळी घेतले. हाँगकाँगला ८ बाद २५९ धावा करता आल्या..

तत्पूर्वी सलामीवीर शिखर धवनच्या शतकी फटकेबाजीवर भारताने ७ बाद २८५ धावा उभारल्या. शिखर धवन आणि अंबाती रायुडू यांच्या भागीदारीमुळे भारतीय संघ दुबळ्या हाँगकाँगसमोर ३०० धावा उभारेल असा कयास चाहते वर्तवत होते. मात्र, धवन आणि रायुडू तंबूत परतल्यानंतर हाँगकाँगच्या गोलंदाजांनी चोख मारा करत मधल्या फळीतील फलंदाजांना बांधून ठेवले. हाँगकाँगकडून किंचित शाहने ३ आणि एहसान खानने २ बळी घेतले. 
डावखुऱ्या धवनने इंग्लंड दौऱ्यातील अपयश धुवून काढत दुबळ्या हाँगकाँग विरुद्ध १२० चेंडूंत १५ चौकार आणि २ षटकारांनी १२७ धावा फटकावल्या. धवनने संघात पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायुडूसोबत दुसऱ्या गड्यासाठी ११६ धावांची भागीदारी रचली. रायुडूने ३ चौकार व २ षटकारांनी ६० खेळी सजवली. प्रभारी कर्णधार रोहित शर्मा २३ धावा काढून परतला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेला दिनेश कार्तिक (३३) मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. महेंद्रसिंग धोनी भोपळ्यावरच माघारी परतला. केदार जाधवच्या (२८) फटकेबाजीमुळे भारताने २८५ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाने ४०व्या षटकांपर्यंत २ बाद २३७ धावांची मजल मारली होती. या परिस्थितीत ३०० धावांपर्यंत भारतीय संघ सहज मजल मारेल, अशी आकडेवारी दिसत होती. परंतु हाँगकाँगच्या गोलंदाजांच्या अप्रतिम माऱ्यामुळे ठराविक धावांच्या अंतराने भारताचे उर्वरित फलंदाज बाद होत गेले. परिणामी, अंतिम १० षटकांत भारताला ४८ धावा करता आल्या. .

No comments:

Post a Comment