लाहोटी कंपाउंड वरून बप्पा निघाला पण सुभाष चौकात ट्रॅफिक जाम मध्ये अडकला. एक पाऊलही पुढे टाकता येईना .पुढेही नाही आणि मागेही नाही .सगळेजण जागच्या जागीच अडकले. कोणी रस्त्यातच गाडी सोडली तर कुठे ऑटो आडवा असल्याने वाहने जागची हलत नव्हती .बाप्पा वैतागला .उंदीर मामाने शक्कल लढवली आणि आपला नेहमीचा मार्ग शोधला.
भुयारी मार्गाने बप्पांची स्वारी उंदीरमामाच्या पाठीवर बसून निघाली .अंधाऱ्या मार्गाने उंदीरमामा पुढे - पुढे जाऊ लागला .काही वेळानंतर ते दोघेही बाहेर पडले .पाहतात तर काय अगदी सुनसान जागेत ते आले होते .कसेबसे रस्त्यावर येत आपण कुठे आहोत याची उंदीरमामाने चौकशी केली तर हा औसा रस्ता असल्याचे लक्षात आले . शहरातली गर्दी पाहून बाप्पालाही कंटाळा आला होता .तर मग आता गर्दी टाळण्यासाठी आपण औशालाच जाऊ असे बाप्पा म्हणाले .उंदीरमामाने बाप्पांची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि औशाकडे कूच केले. जाता जाता उंदीर मामा तिथे जाऊन काय करणार? औसा येथे ना पाणी आहे ना पीक. दुष्काळी तालुक्यात नेत्यांचे पीक मात्र खूप आले असल्याचे बप्पांनी सांगितल्यावर उंदीरमामाने पुन्हा प्रश्न केला .बाहेरच्या नेत्यांना घेऊन काय करायचे? औशाचे नेते तर आज अज्ञातवासात आहेत .मारुतीची कृपा झालेले दिनकरराव शोधूनही सापडत नाहीत .कलमुगळीहुन आलेल्या पाशाने जलयुक्त मध्ये डुबकी मारली पण त्याला आपला गाशा गुंडाळावा लागला .
आता पुन्हा अभिमन्यू नादी लागला आहे .किल्लारीची साखर त्याला खायची असल्याचे दिसत आहे .पण डायबेटिस झाला तर ?उंदीरमामा स्वतःच बोलू लागतो .आणि हो ,झंवर काका आज-काल दिसत नाहीत .बहुधा ते साक्षर झाले असावेत म्हणूनच त्यांनी येथून काढता पाय घेतला इथे दोन महाराजही राहतात .त्यांनीही अनेकांना भजनाला लावलेय म्हणे ! पण या सगळ्याचा फायदा दुसराच कोणीतरी घेणार का ?बप्पा शांतपणे ऐकत होता . उंदीरमामा पुन्हा विचारता झाला . निलंग्याचे धाकले भैय्या येथे येणार असल्याचे ऐकत आहे .त्यांचे काय ? आणि हो ,उस्मानाबाद जिल्ह्याचे असणारे आणि आता इथलेच होऊन गेलेले बसवराज पाटीलकी दाखवतच आहेत .त्यांची पाटीलकी कुठवर चालेल ?की यंदा संस्थान खालसा होणार ?बप्पा काहीतरी बोला ,उंदीरमामा म्हणू लागला .तोपर्यंत बप्पांची स्वारी औसा मोडवर पोहोचली होती .चेवले बोरवेल्स मध्ये डोकावून पाहत उंदीरमामाने कानोसा घेतला .पण कसली खुडबुड न दिसल्याने पुढे निघाला .औशात फेरफटका मारावा म्हणून बप्पांनी उंदीरमामाची स्टिअरिंग शहरात वळवली तर काय जागोजागी स्वच्छतेचे ढिगारे दिसू लागले.
मुख्य रस्त्याला लागूनच भली मोठी सरकारी इमारत दिसली. हे काय ?असा विचार बप्पा करू लागला तर ती वचनपूर्ती असल्याचे आपल्याला समजले आहे असे उत्तर लगेच उंदीरमामाने दिले .आणखी काय काय वचने दिली होती? आणि ती वचने देणारा आहे कुठे ?भेटेल का ?याची चौकशी करून ये म्हणून बाप्पाने उंदीरमामाला पाठवून दिले आणि आपण मात्र एका टपरीवर उभा राहिला .त्यानेही चौकशी केली तर पाटीलकी दाखवणारे बसवराज मुरमाकडे गेले आहेत . आता त्यांची भेट होणार नाही अशी माहिती बप्पाला मिळाली. उंदीरमामा मात्र अजून यायचा होता .त्याला शोधत बप्पा पुढे निघाला .एका जागी काही लोकांनी उंदीरमामाला घेराव घातल्याचे त्याने पाहिले .हा काय प्रकार असावा म्हणून बप्पा त्यांच्याजवळ गेला तर ती मंडळी स्वाभिमानी असल्याचे त्यांनी सांगितले.
हमीभाव केंद्र सुरु करा ,हमी भावाने घेतलेल्या धान्याचे पैसे लगेच द्या असे काहीसे ते लोक बोलत होते .बरं बरं असं म्हणत दोघांनीही तेथून काढता पाय घेतला आणि औशातून बाहेर पडले. बेलकुंड येथे जाऊन मारुती महाराजांची भेट घ्यावी असा विचार बप्पाने बोलून दाखवला .दोघेही तिकडे गेले .पाहतात तर काय तिथे आता फक्त भंगार पडल्याचे दिसून आले. इथपर्यंत आलोच आहोत तर श्रीपतरावांना भेटून जाऊ .हवा -पाण्याच्या गप्पा मारू म्हणून उंदीरमामाने बाप्पाला तिकडे नेले तर ते काकडी खात बसले होते. औशाकडे येऊन काहीच फायदा झाला नाही .आपली पूजा करायला इथे कोणी उपलब्ध नाही. जाऊदे ,असे म्हणत बाप्पा रस्त्याचे काम सुरू असणाऱ्या माळरानावर बसले .डोळे मिटून त्यांनी एकंदर आढावा घेतला तर सोमवंशातला संतोष पटापट तयारी करत असल्याचे त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेले.
औशात फार मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले .तिकडे किल्लारीचे बॉयलर धडधड पेटले होते पण अनेकांना त्याची हाय लागत असल्याने पळापळ सुरू होती. त्यातच धाकले भैय्या आणि पाटीलकी गाजवणाऱ्या बसवराज यांना किल्लारीच्या बॉयलरची धग कुठपर्यंत जाते याची माहिती असल्याने ते दोघे निश्चिंत होते . पुढे काय याचा अंदाज बप्पा घेऊ लागले तेवढ्यात बप्पा औशात येऊन गेले पण आपली भेट झाली नाही याची वार्ता समजल्यामुळे बसवराज औशाकडे रवाना झाल्याचे वृत्त वृद्ध उंदीरमामाने बाप्पांच्या कानी घातले .त्यांची भेट आपण लातुरात जाऊनच घेऊ असे म्हणत बप्पांनी उंदीर मामाला निघण्याचा इशारा केला आणि दोघेही लातूरच्या दिशेने रवाना झाले...

No comments:
Post a Comment