लातूर प्रतिनिधी,
लातूर शहरात डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्ल्यूची साथ मोठया प्रमाणात पसरली असून यातूनच नागरिकांच्या जीवीताला मोठा धोका निर्माण झाला आहे. लातूर महानगरपालिकेने या गोष्टीची तातडीने दखल घेवून साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी युध्द पातळीवर उपाययोजना आखाव्यात अशा आशयाच्या सूचना असलेले पत्र माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
लातूरच्या मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रात आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, मागच्या काही दिवसात वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे साथीच्या रोगाचा प्रसार झपाटयाने होत आहे. त्यात लातूर शहरात ठिकठीकाणी कचरा साठल्याचे दिसून येत आहे, नाल्या, गटारी वेळेत साफ होत नाहीत. त्यामुळे डासांची उत्पती वाढली असून मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू हे साथीचे रोग पसरत आहेत. शहरातील सर्व रुग्णांलयात रुग्णांची गर्दी मोठया प्रमाणात वाढली आहे. या रुग्णांची तपासणी केली असता डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू या घातक रोगांची लागण अनेक रुग्णांना झाली असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे.
लातूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब धोकादायक आहे. वेळीच काळजी नाही घेतली तर यातून अनर्थ उद्भावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने युध्द पातळीवर साथीचे रोग रोखण्यासाठी प्रभावी आरोग्य यंत्रणा उभारणे आणि उपाय योजनांची उपलब्धता करुन देणे आवश्यक आहे.
शासनाच्या आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून महापालिकेने स्वच्छता औषध फवारणी आणि जनजागृतीची मोहिम तातडीने हाती घ्यावी, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असेही आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे.

No comments:
Post a Comment