मुंबई दि.२७- जनतेला दिवसेंदिवस अडचणीत टाकणारे निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारविरुध्द राहुल गांधी खंबीरपणे लढा देत आहेत. परिवर्तनाची मोठी शक्ती असणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'जगू किंवा मरु फक्त काँग्रेससाठी' या निर्धाराने त्यांचे हात बळकट करावेत आणि देशातील व राज्यातील परिवर्तनाची लढाई यशस्वी करावी असे आवाहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या विधानसभा, जिल्हा व प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नूतन कार्यकारिणीची राज्यस्तरीय निर्धार बैठक आज मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सिंह सुरजेवाला, माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, खा. अशोक चव्हाण,खा. राजीव सातव, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमित झनक, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, माजी आमदार उल्हासदादा पवार आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दररोज वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या सर्वांनाच अस्वस्थ करणाऱ्या असून देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविण्याची प्रचंड ताकद पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आहे असे सांगून आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांच्या समोर ठामपणे उभे राहण्यासाठी मोठे धाडस लागते आणि थेट पंतप्रधानांवर आरोप करण्याचे धाडस राहुल गांधी दाखवत आहेत. त्यांचा हा आत्मविश्वास युवकांमध्ये ऊर्जा आणि उत्साह वाढविणारा आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी जोरदार आघाडी उघडली आहे. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या लढाईत सहभागी होवून आपली युवा शक्ती त्यांच्या मागे उभी करून देशात परिवर्तन घडवावे असेही आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी म्हटले.
देशातील आणि राज्यातील युवक काँग्रेसला चांगली परंपरा आहे आणि हिच परंपरा आपल्याला अधिक समृध्द करावयाची आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे मावळते अध्यक्ष विश्वजित कदम यांनी सर्व युवकांना सोबत घेऊन संघटना मजबूत केली आहे. युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष सत्यजित तांबे आणि त्यांचे सहकारी हा पायंडा कायम ठेवतील. राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात परिवर्तनासाठी मोठी शक्ती उभारतील असा विश्वासही आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment