पुणे : . 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष... पारंपरिक वाद्ये आणि ढोल-ताशांचा गजर... आकर्षक फुलांची सजावट अशा भक्तिमय वातावरणात पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे आगमन झाले. मानाच्या सर्व गणपतींच्या मिरवणुकीत गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
मानाचा पहिला कसबा गणपती.
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला असणाऱ्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आली. कसबा गणपतीच्या सकाळी १० वाजता निघालेल्या मिरवणुकीत देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, श्रीराम, आवर्तन ढोल-ताशा पथक आणि प्रभात बँड पथकाचा समावेश होता. पालकमंत्री गिरीश बापट व अभिनेता सुबोध भावे, अभिनय बेर्डे यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. .
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी .
मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी दहा वाजता नारायण पेठेतील न. चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून प्रारंभ झाला. यामध्ये सतीश आढाव यांचा नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा व ताल ढोल-ताशा पथकाचा सहभाग होता. पारंपरिक चांदीच्या पालखीतून 'श्रीं'ची मिरवणूक मंदार लॉज- कुंटे चौक- लक्ष्मी रस्ता- गणपती चौक ते ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीमार्गे मंदिरानजिकच्या उत्सव मंडपात आली. श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी बांधकाम व्यावसायिक अमोल रावतेकर यांच्या हस्ते करण्यात आली. .
मानाचा तिसरा गुरुजी .तालीम गणपती.
फुलांच्या रथात विराजमान झालेली 'श्रीं'ची उत्सवमूर्ती मिरवणूक काढून गणपती चौक- लिंबराज महाराज चौक- आप्पा बळवंत चौक- बुधवार चौक- बेलबाग चौकमार्गे उत्सवमंडपात आणण्यात आली. जयंत नगरकर यांचा नगारा वादन, अश्वराज बॅण्ड, नादब्रम्ह, गर्जना तसेच सासवड येथील शिवरूद्र, गुरुजी प्रतिष्ठान आदी ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. 'श्रीं'ची प्रतिष्ठापना दुपारी १ वाजता उद्योगपती आदित्य शर्मा यांच्या हस्ते करण्यात आली. .
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती.
'श्रीं'ची मिरवणूक सकाळी दहा वाजता गणपती चौक येथून निघाली. फुलांच्या रथातून 'श्रीं'ची मूर्ती मिरवणूक काढून गणपती चौक- नूमवि शाळा- आप्पा बळवंत चौक- फरासखाना- समाधान चौक- गणपती चौक येथून उत्सवमंडपात आणण्यात आली. या मिरवणुकीत लोणकर बंधुंचे नगारा वादन, उगम, स्वामी प्रतिष्ठान, गजर आदी पथके सहभागी झाली होती. 'श्रीं'ची प्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजता अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजंय राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आली..
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती.
पारंपरिक पद्धतीने पालखीतून 'श्रीं'च्या मिरवणुकीस सकाळी दहा वाजता रमणबाग चौकातून सुरुवात झाली. ही मिरवणूक लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह, माती गणपतीमार्गे टिळकवाड्यातील सभामंडपात दाखल झाली. मिरवणुकीत श्रीराम आणि शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके, बिडवे बंधुंचे नगरावादन पथक सहभागी झाले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. केसरी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक हे मिरवणुकीत सहभागी झाले होते..

No comments:
Post a Comment