जैश'च्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

Friday, September 14, 2018

श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील बारामुल्ला आणि रिसी जिल्ह्यात चकमकीत कुख्यात 'जैश-ए-मोहम्मद'च्या एकूण पाच अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याचे वृत्त आहे. बारामुल्लातील सोपोरमध्ये २, तर रिसीतील कक्रीयाल भागात ३ दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी घडलेल्या गोळीबारात १२ जवान जखमी झाल्याचे समजते. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे.
सोपोरस्थित आरमपुरा येथील छिंकीपुरामध्ये दहशतवादी दडून बसल्याची गोपन्ीाय माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी करीत शोधमोहीम हाती घेतली. याचदरम्यान अतिरेक्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला असता चकमकीचा प्रत्यय आला. यात पाकमध्ये सक्रिय असलेल्या कुख्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन म्होरक्यांचा खात्मा करण्यात जवान यशस्वी ठरले.

 या परिसरातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, अशी माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिली. अली ऊर्फ अथर आणि झिया-उर-रेहमान अशी मृत दहशतवाद्यांची नावे आहेत. जैश-ए-मोहम्मदशी त्यांचे लागेबांधे आहेत. अली हा जैशचा वरिष्ठ म्होरक्या आहे. २०१४ पासून तो अतिरेकी कारवायांमध्ये सक्रीय आहे. ६ जानेवारी रोजी सोपोरमध्ये घडलेल्या शक्तिशाली आयईडी स्फोटामागे त्याचा हात होता, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

 दुसरीकडे, रिसी जिल्ह्यात 'जैश'च्या दोन दहशतवाद्यांना ठार मारल्याचे ठोस वृत्त आहे. उप-पोलीस महाधिक्षक मोहन लाल यांच्यासह १२ जवान जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या नारायणा रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्याच्या कक्रीयाल भागात पोलिसांनी ड्रोन आणि विमानांच्या साहाय्याने विशेष अभियान राबविले असता धुमश्चक्रीचा प्रत्त्यय आला. दहशतवादी व पोलीस यांच्यात बराच वेळ गोळीबार झाला. .

No comments:

Post a Comment