लखनऊ:
सर्वोच्च न्यायालयात राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित असला तरी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनेत्यांनी राम मंदिराबाबत उलटसुलट विधानं करण्यास सुरुवात केली आहे.योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने 'सर्वोच्च न्यायालय आमचंच आहे, राम मंदिरहोणारच', असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे.
बहराईचमधील केसरगंज विधानसभेचं प्रतिनिधीत्व करणारे भाजपा आमदार आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांना राम मंदिराच्या उभारणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयदेखील आमचंच आहे, असं म्हटलं.'भाजपा विकासाच्या मुद्यावर सत्तेवर आला आहे. मात्र तरीही राम मंदिराची उभारणी होणारच. कारण तो आमचा संकल्प आहे. सध्या हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे आणि सर्वोच्च न्यायालयदेखील आमचंच आहे,' असं वर्मा म्हणाले.
'न्यायपालिकाच नव्हे तर प्रशासन, देश आणि राम मंदिरही आमचंच आहे', असंही त्यांनी ठासून सांगितलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून वादळ उठताच त्यांनी सारवासारव केली. आपण या देशाचे नागरिक आहोत, त्यामुळे कोर्टावर आपला संपूर्ण विश्वास आहे, असं मी म्हणालो होतो. कोर्टावर सरकारचा अंमल आहे, असं मी म्हणालो नव्हतो, अशी सारवासारव वर्मा यांनी केली. यापूर्वी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनीही राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा पास केला जाऊ शकतो, असं म्हणून वाद निर्माण केला होता.

No comments:
Post a Comment