हैदराबाद : कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच विधानसभा विसर्जित करण्यात आलेल्या तेलंगणात भाजपकडून लवकरच निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह येत्या १५ तारखेपासून राज्यात पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडतील, असे स्थानिक भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे..
येत्या १५ तारखेला मेहबूबनगर येथे एका विराट जनसभेच्या माध्यमातून शाह भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करतील, असे भाजप आमदार एन. रामचंद्र राव यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय नेते तसेच भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्रीही प्रचार मोहिमेत सहभागी होणार आहेत.
संपूर्ण प्रचारादरम्यान हे नेते तेलंगणाचा दौरा करतील, असे राव म्हणाले. प्रत्येक मतदारसंघात भाजपकडून सभांचे आयोजन केले जाईल. भाजपकडे केवळ राज्यासाठीचा जाहीरनामा नसून, विभागनिहाय स्थानिक जाहीरनामाही भाजपकडे आहे, असे ते पुढे म्हणाले. या विधानसभा निवडणुकीत भाजप कुणाशीही आघाडी न करता स्वबळावर लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
दिल्ली येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत तेलंगणा निवडणुकीच्या मुद्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या जून महिन्यात तेलंगणात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता होती. मात्र, याआधीच विधानसभा विसर्जित करण्यात आल्याने राज्यात आता मुदतपूर्व निवडणुका घेतल्या जातील. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात लवकर घोषणा केली जाऊ शकते..

No comments:
Post a Comment