'देशिकेन्द्र'च्या विद्यालयात पर्यावरण पूरक गणेशमूर्ति

Sunday, September 9, 2018

लातूर : 
येथील श्री देशिकेन्द्र माध्यमिक विद्यालयात शनिवारी पर्यावरण पूरक गणेशमूर्ति बनवून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. कला विभागाच्या वतीने कला शिक्षक वर्षा सांडे, श्रीमती वनिता भाताम्ब्रेकर व मनोज बनाळे यांच्या प्रेरणेतून पार पडलेल्या या उपक्रमात 350 ते 400 विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवला. 

रासायनिक रंग आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जल प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीं बनवण्याचा उपक्रम श्री देशीकेन्द्र विद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत आहे. प्रदूषण विषयक जाणीवा जागृति व्हावी, म्हणून आमचा छोटासा प्रयत्न आहे, अशी माहिती देऊन कला विभाग प्रमुख सौ. वर्षा सांडे म्हणाल्या की, गणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणा‍ऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होते. त्यात जिप्सम, कॅल्शियम, सल्फर, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम आदि घातक घटक आढळतात. यातील जिप्सम हा प्रमुख घटक अविघटनशील आहे आणि त्यामुळेच मूर्तीचे विघटन होत नाही. 

त्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसबरोबर मूर्तीला लावल्या जाणा‍ऱ्या रंगांतही पारा, कॅडमियम, शिसे व कार्बन संयुगे असतात व ही बहुतेक सगळी जलचरांसाठी घातक असतात, असं सिद्ध झालं. त्यामुळे प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या सामाजिक चळवळीत सहभाग म्हणून आम्ही शालेय पातळीवर इको फ्रेंडली गणेशोत्सव संकल्पना राबवली. या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापिका सौ. एस. एम. चौगुले, पर्यवेक्षक जगदेवी माकणे, सुहासिनी कल्याणी, सुरेश नसके, उमेश गिरवलकर, उमाकांत स्वामी, आर. व्ही. स्वामी यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment