लातूर ः केमिस्ट्री विषयातील पिरियॉडीक टेबल अर्थात 118 मूलद्रव्यांची आधुनिक आवर्तसारणी मुखोद्गत करून ती अवघ्या 01 मिनीट 07 सेकंदात उलट क्रमाने मांडणी करून पाचवा विश्वविक्रम लातूरच्या सचिन डेंगळे या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आपल्या नावे नोंदविला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी 12 ऑक्टोबर 2017 रोजी सचिन डेंगळे यांनी हाच टेबल 01 मिनीट 22 सेकंदात सादर करून विश्वविक्रम नोंदविला होता. आता 01 मिनीट 07 सेकंदाच्या सादरीकरणाने 01 मिनीट 22 सेकंदाचा स्वतःच्या नावे असलेला पूर्वीचा विश्वविक्रम सचिन डेंगळे यांनी मोडला आहे.
लातूर येथील सुतमिल रोड परिसरातील रहिवासी सचिन गुंडीराम डेंगळे हे निलंगा तालुक्यातील गुंजरगा येथील जि.प.शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या स्मरण शक्तीच्या जोरावर केमिस्ट्री विषयातील मूलद्रव्यांची आधुनिक आवर्तसारणी मुखोद्गत केली असून या कौशल्याची चुणूक त्यांनी 26 मे 2017 रोजी पाँडेचेरी येथे असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड्स रिसर्च फाऊंडेशनच्या सादरीकरणावेळी दाखविली. यावेळी त्यांनी 2 विश्वविक्रम नोंदविले आहेत. पहिला विश्वविक्रम त्यांनी मूलद्रव्यांची आधुनिक आवर्तसारणी 01 मिनीट 28 सेकंदामध्ये सादर करून नोंदविला. यावेळी त्यांनी पुर्वीचा 02 मिनीट 46 सेकंदाचा विश्वविक्रम मोडला. दुसरा विश्वविक्रम त्यांनी हीच मूलद्रव्यांची आधुनिक आवर्तसारणी उलट क्रमाने 01 मिनीट 35 सेकंदात सादर करून पूर्णपणे नवीन विश्वविक्रम नोंदविला आहे. दरम्यान सचिन डेंगळे यांनी 12 ऑक्टोबर रोजी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या आशिया खंडाच्या नवी दिल्ली येथील विभागीय कार्यालयात परिक्षकांसमोर 1 मिनीट 22 सेकंदात मूलद्रव्यांची आधुनिक आवर्तसारणी सादर करून तीसरा विश्वविक्रम नोंदविला. तसेेच ‘वन मिनीट मिरॅकल’ या प्रकारामध्ये सचिन डेंगळे यांनी चौथा विश्वविक्रम नोंदविला आहे. 60 सेकंदामध्ये उलट क्रमाने 85 मूलद्रव्यांची (118 ते 33) मांडणी करून सर्वाधिक मूलद्रव्ये म्हणून दाखविण्याचा विश्वविक्रम नोंदविला आहे. आता दि. 25/9/2018 रोजी सचिन डेंगळे यांनी इंडीयन अचिव्हर बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेमधून 01 मिनीट 07 सेकंदामध्ये मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीची उलट क्रमाने मांडणी करून आपला पूर्वीचा 01 मिनीट 22 सेकंदाचा विश्वविक्रम मोडला आहे. या विश्वविक्रमानंतर सचिन डेंगळे यांना विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र संस्थेचे प्रमुख श्री गुणसेखरण सुंदरराज व त्यांच्या परिक्षक समितीने नुकतेच प्रदान केले आहे. या विश्वविक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
मेमरी टेक्नीक्स्चा सचिन डेंगळे यांचा अभ्यास असून याद्वारे त्यांनी इ.स.1600 ते 2600 असे सुमारे 1 हजार वर्षांचे कॅलेंडर लक्षात ठेवले आहे. यातील कोणतीही तारीख सांगितली असता त्या तारखेचा वार काही सेकंदात अचुकपणे सांगतात. मेमरी टेक्नीक्स्च्या सहाय्याने अभ्यासक्रमातील कोणतेही व कितीही घटक स्मरणात ठेवण्याचे कौशल्य त्यांनी प्राप्त केले आहे. या कौशल्या आधारे त्यांनी इतिहास विषयातून नेट व सेट या परिक्षा उत्तीर्ण केल्या असून त्यांची इयत्ता 11 वी व 12 वी अभ्यासक्रम पुनर्रचना व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इतिहास विषयाच्या अभ्यासगट समितीवर निवड झालेली आहे. तरी त्यांच्या या विश्वविक्रमाबद्दल अधिकारी, पदाधिकारी, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, आप्तईष्ट व मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.

No comments:
Post a Comment