विलासरावांच्या स्मृतीदिनानिमीत्त आरोग्य शिबीराचे आयोजन

Monday, August 13, 2018

दोनशे रूग्णालयांमध्ये होणार तपासणी व उपचार
लातूर / प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमीत्त 14 ऑगस्ट रोजी लातूर शहर व जिल्ह्यातील सुमारे 200 पेक्षा अधिक रूग्णालयात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीरात अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमियोपॅथी तसेच दंत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांकडून गरजू रूग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत अशी माहिती आयएमए अध्यक्ष डॉ. रमेश भराटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आ. अमित देशमुख, डॉ. पोद्दार, डॉ.चेतन सारडा ,डॉ. डी.एन.चिंते, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, मोईज शेख, डॉ. आरदवाड, अ‍ॅड. दिपक सूळ, डॉ. नितीन शितोळे, डॉ. कल्याण बरमदे आदी उपस्थित होते. . 

सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी नेहमीच प्राथमिकता देवून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण यावेत म्हणून आयुष्यभर जनसेवा केली असे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख फाऊंडेशन तसेच इंडियन मेडीकल असोसिएशन, निमा, दंत वैद्यकीय आणि होमिओपॅथी या वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 14 ऑगस्ट रोजी लातूर शहर व जिल्हाभरात महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या शिबीराअंतर्गत लातूर शहर व जिल्ह्यातील 200 खाजगी रूग्णालयात रूग्णांची तपासणी व त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीराचा सर्व वयोगटातील रूग्णांना लाभ होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणतजे या उपक्रमांत अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय क्षेत्रातील सर्व नामवंत तज्ञ डॉक्टर सहभागी होत आहेत. शिबीरात साथीच्या रोगापासून ह्दय रोग, कॅन्सर आदी सारख्या महागडे उपचार असलेल्या रूग्णांचीही तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीर काळात अनेक रूग्णालयात अ‍ॅन्जीओग्राफीतून सिटीस्कॅन, आर.आर.आय सारख्या तपासण्याही मोफत किंवा नाममात्र दरात करण्यात येणार आहेत. 

आपल्या लोकनेत्यांच्या स्मरणार्थ एकाच दिवशी एकाच शहरात 200 पेक्षा अधिक ठिकाणी अयोजित होणारे महाआरोग्य शिबीर हा एकमेव सामाजिक उपक्रम असावा. ज्या नेत्याने सर्वसामान्यांच्या सुख, दु:खात त्यांना साथ दिली, त्यांच्या विकासासाठी अहोरात्9 कार्य केले अशा लोकतेने विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देताना त्यांनी दिलेला लोकसेवेचा वसा व वारसा पुढे चालू ठेवून जनसामान्यांच्या उद्धारासाठी सतत कार्यरत राहणे हीच खरी लोकनेत्यास श्रद्धांजली ठरणार आहे.

विलासराव देशमुख फाऊंडेशन, इंडियन मेडीकल असोसिएशन, निमा असोसिएशन, दंत वैद्यकीय आणि होमिओपॅथी असोसिएशन यांच्या मार्फत मागील 4 वर्षापासून आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येते. 2014 साली 5,000 रूग्णांनी, 2015 या वर्षी 7,500 रूग्णांनी, 2016 या वर्षी 10,000 तर 2017 या वर्षी 18,000 रूग्णांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबीरात जवळपास 20 ते 25 हजार रूग्णांची तपासणी व उपचार करण्यात येईल.

No comments:

Post a Comment