भाजपाची लोकसभा प्रचार यंत्रणेला गती लोकसभा मतदारसंघासाठी प्रभारी जाहीर

Thursday, August 23, 2018


 
लातूर :आगामी लोकसभेच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रचार यंत्रणा गतिमान करण्यासाठी भाजपाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी एक प्रभारी जाहीर केला असून जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी सह विविध पातळ्यांवर काम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे .

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी लोकसभा मतदारसंघांसाठी प्रभारी नेत्यांच्या नावांची घोषणा केली .यात बीड  मतदारसंघासाठी माजी आमदार गोविंदराव केंद्रे, औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी श्रीकांत देशपांडे, परभणी मतदारसंघासाठी अजित गोपछडे, हिंगोली लोकसभेसाठी शिरीष बोराळकर, लातूरसाठी ॲड .मिलिंद पाटील तर उस्मानाबाद व जालना लोकसभा मतदारसंघांसाठी अनुक्रमे मनोज पांगारकर व गणेश हाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे .आमदार निलय नाईक नांदेड लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.

 प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी  या नेमणुका जाहीर करतानाच प्रभारी नेते मतदारसंघात काय काम करतील याचीही माहिती दिली .प्रभारी म्हणून नियुक्त झालेल्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात संघटनात्मक बांधणीला गती द्यावयाची आहे. याशिवाय मतदारसंघासाठी एक  सोशल मीडिया प्रमुख व दोन सहप्रमुख ,लीगल सेल साठी एक प्रमुख व दोन सहप्रमुख, लाभार्थ्यांच्या संपर्कासाठी एक पुरुष व महिला कार्यकर्ता तर मीडिया विभागासाठी एक प्रमुख व दोन सहप्रमुख यांच्या नियुक्त्या 1 सप्टेंबर पूर्वी  करावयाच्या आहेत. याशिवाय याच कालावधीत जिल्ह्याचा दौरा करून विभागीय संघटनमंत्री , त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संबंधित महामंत्री यांच्याशी चर्चा करून या कार्याचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यास  सांगण्यात आले आहे . 

प्रदेश कार्यकारिणीच्या आगामी बैठकीला जोडूनच या प्रभारींची बैठक घेतली जाणार आहे .प्रदेश प्रभारी सरोज पांडे या तीन-चार लोकसभा क्षेत्राच्या क्लस्टरची बैठक घेणार आहेत .एकंदर पक्षाच्या हालचाली पाहता 2019म  मध्ये  होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी चालवली असल्याचे दिसून येत आहे . किंबहुना आतापासूनच प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी पक्षाने कंबर कसली असल्याचेही स्पष्ट होत आहे .

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment