अहमदपूर /प्रतिनिधी: अहमदपूर पंचायत समितीच्या उपसभापती मंगलाबाई खंदाडे यांच्या विरोधात सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज गुरुवारी मंजूर करण्यात आला. त्यामुळे खंदाडे यांना उपसभापती पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी उपसभापती मंगलाबाई खंदाडे यांच्याविरोधात पंचायत समिती सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या ठरावावर चर्चा करण्यासाठी आज पंचायत समितीच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती .एकूण 15 सदस्यांपैकी आठ सदस्य या बैठकीला उपस्थित होते . या बैठकीत अविश्वास ठरावाला मंजुरी देण्यात आली.
अहमदपूर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे भाजपाकडे आहेत. सौ .अयोध्याताई केंद्रे या सभापती आहेत .त्यांचे पती अशोकराव केंद्रे हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात भाजपाचे सर्वाधिक नेते आहेत शिवाय विधानसभा लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या याच तालुक्यात सर्वाधिक आहे .त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता अहमदपूर पंचायत समितीमध्ये झालेल्या या घडामोडीमुळे भाजपामध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे . अविश्वास ठराव येऊ नये आणि तो मंजूर होऊ नये यासाठी नेतेमंडळींनी या प्रकरणात लक्ष घातले होते. परंतु तरीही अविश्वास ठराव मंजूर झाला .भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे अविश्वास ठराव मंजूर होऊ नये यासाठी विश्रामगृहावर थांबून होते पण त्याचा उपयोग झाला नाही .अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष निडवदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना अहमदपूरचे आमदार विनायकराव पाटील यांनी एखादी चांगली बाब घडवून आणण्यासाठी खूप मेहनत करावी लागते परंतु याउलट बिघडवण्यासाठी काहीच करावे लागत नाही असे मत व्यक्त केले .एकंदर या प्रकारामुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
No comments:
Post a Comment