लातूर :अटल बिहारी वाजपेयी हे एक सत्शील राजकारणी , अमोघ वक्ते ,प्रतिभाशाली कवी आणि सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचे मन ओळखणारे व्यक्तिमत्व होते. राजकीय संत असेच त्यांचे वर्तन राहिले . त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, अटलजींना आदर्श मानून आपली वाटचाल सुरू आहे असे सांगणारे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर भावनाविवश होऊन बोलत होते .
गुरुवारी सायंकाळी अटलजींच्या निधनाची वार्ता काळजाला जखम करणारी ठरली. मन बेचैन झाले .त्यामुळे त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दिल्लीकडे धाव घेतली. शुक्रवारी सकाळी पक्ष कार्यालयात त्यांचा पार्थिव देह ठेवण्यात आला होता. त्यानंतर दुपारी अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत सहभागी होऊन अटलजींचे विचार मनात दृढ करण्याची संधी मिळाली. राजकारणात राहूनही स्वच्छ चारित्र्य आयुष्यभर जपणारे अटलजी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. राजकीय कसब आणि त्यापेक्षा विरोधकांनाही आपलेसे करणारे व्यक्तिमत्व सर्वांसाठीच दिशादर्शक आहे. अटलजींची भाषणे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. तीच प्रेरणा आता आपल्या सोबत राहणार आहे, असेही अरविंद पाटील म्हणाले.
देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आणि आपल्या कामाच्या माध्यमातून ठसा उमटवणारे अटलजी आज आपल्यात हयात नाहीत यावर विश्वासच बसत नाही .त्यांच्या कविता सतत मनात घोळत राहतात .या कविता मधील प्रत्येक शब्द आजचा तरुण व विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ असावा असाच आहे . या प्रत्येक शब्दावर चिंतन व मनन करून तरुणांना आपले आयुष्य घडविता येणार आहे .म्हणून अटलजी गेले असे समजून चालणार नाही तर एक पत्रकार ,संपादक ,कवी, पंतप्रधान, भाजपाचे माजी अध्यक्ष ,जनसंघाचे अध्यक्ष असणारे अटलजी त्यांच्या कार्याने अमर आहेत असेही युवानेते अरविंद पाटील यावेळी बोलताना म्हणाले
No comments:
Post a Comment