आज गुरूवारी सकाळपासूनच मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या हिंगोली जिल्हा बंदला अभुतपुर्व प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनात महिला रणरागिनींनीही उडी घेतली आहे. वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगावसह हिंगोली तालुक्यातील ग्रामीण भागातही बंद पुकारण्यात आला आहे. हिंगोली-नांदेड, हिंगोली-परभणी, हिंगोली-वाशिम या राज्य रस्त्यावर ठिकठिकाणी मराठा आंदोलकांचे जथेच्या जथे ठाण मांडून आहेत. जिल्हाभरात शंभराहून अधिक ठिकाणी रास्ता रोको सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर दुपारी सव्वा एकच्या सुमारास सेनगावात बोलेरो गाडी जाळल्याची घटना घडली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने आज 9 ऑगस्ट रोजी चक्का जाम, बाजारपेठा बंद असे आंदोलन छेडण्यात आले आहे. सेनगावात आंदोलकांनी स्कुल बस जाळल्याची ताजी असताना रस्त्यावरील बांधकामाच्या कामावर असलेली मध्यप्रदेश राज्यातील बोलेरो गाडी अज्ञात आंदोलकांनी फुकून दिल्याची हिंसक घटना घडली आहे. तर एका गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलन सेनगाव तालुक्यात हिंसक वळण घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नांदेड नाक्यावर शेकडो मराठा युवकांनी शासनाच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन सुरू केले आहे. सकाळी 9 वाजल्यापासून सुरू असलेले मुंडण आंदोलन दुपारी 1 वाजेपर्यंत सुरूच होते.
तसेच हिंगोली शहरात गांधी चौक, खटकाळी बायपास, नर्सी फाटा, अकोला बायपास, जवळा पळशी रोड आदी ठिकाणी शेकडो आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून आहेत. तर येथील लालालजपतराय नगरसमोर चक्क महिलांनी रस्त्यावर येत आरक्षणासाठी एल्गार सुरू केला आहे. यावेळी महिला तरूणी पोवाडे सादर करीत असल्याने परिसर दणाणून गेला आहे. सुर्यास्त होईपर्यत हा रस्ता आम्ही सोडणार नाही असा पवित्रा या महिला आंदोलकांनी घेतला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील लाख फाटा, हिवरा फाटा, बोरजा फाटा, येहळेगाव सोळंके, सुरवाडी, औंढा शहर, शिरडशहापूर, जिंतूर टी पाईंट यासह जिल्हा रस्त्यावरही हे आंदोलन सुरूच आहे. वसमत तालुक्यातील आंबा चोंडी, कुरूंदा, पळसगाव, गिरगाव, शिंदे पांगरा, बोखारे पांगरा यासह वसमत शहरात आंदोलनाची धग दिसून येते. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, पळशी, केंद्रा बु., पानकनेरगाव, कोळसा, पुसेगाव पाटी आदी ठिकाणी आंदोलन सुरू आहे. कळमुनरी तालुक्यातील हिंगोली-नांदेड राज्य रस्त्यावर माळधामणी फाटा, माळेगाव, सावळा फाटा, घोडा कामठा, आखाडा बाळापूर, दाती, वारंगा फाटा, डोंगरकडा फाटा येथे आंदोलन सुरू आहे. नांदापूर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा करून त्याचे दहन करण्यात आले. आंदोलकांनी रस्त्यावर ट्रॅक्टरही आडवे लावून रास्ता रोको केला. टायरही जाळले. तर हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता, डिग्रस कऱ्हाळे, बळसोंड, माळहिवरा, कनेरगाव नाका, पेडगाव, सावरखेडा, खानापूर आदी ठिकाणी राज्य रस्त्यावर रास्ता रोको सुरू आहे.
ठिकठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून रस्त्यावरच संसार मांडला. यामध्ये महिलांनी दळण निसले, खिचडी शिजविली तर शेतकऱ्यांनी काही ठिकाणी गुरे-ढोरेही रस्त्यावर आणली. दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात सेनगाव वगळता शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. दरम्यान, बुजूर्ग जानकारांच्या मते हिंगोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा कडकडीत बंद पाळला जात आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment