सोमवारपासून राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला होणार प्रारंभ
लातूर, दि. १८ : येथील दयानंद कला महाविद्यालय, एस.एम.आर. स्विमिंग पूल व लातूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने लातुरात दि. २० ते २४ ऑगस्ट २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वरिष्ठांच्या आंतर जिल्हा व राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील २४ जिल्ह्यांतून एकूण ३६७ बॅडमिंटन खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. लातूरच्या क्रीडा इतिहासात प्रथमच या सर्व स्पर्धांचे यु ट्यूबवरून थेट प्रक्षेपण केले जाणार असून बॅडमिंटनप्रेमी रसिकांसाठी या स्पर्धा अत्यंत भव्य - दिव्य स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सोमवार, दि. २० ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी साडे नऊ वाजता संपन्न होणार आहे. माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून रेणुकाई कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगांवकर यांची उपस्थिती राहणार आहे. हा उद्घाटन सोहळा दयानंद बॅडमिंटन स्टेडियम या ठिकाणी होईल. या स्पर्धेदरम्यान एकेरी - दुहेरी असे एकूण ३६७ सामने खेळविले जाणार आहेत. या स्पर्धा दयानंद इनडोअर स्टेडियम, एसएमआर बॅडमिंटन कोर्ट व सुशीलादेवी महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्टवर खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील नामांकित खेळाडूही सहभागी होत असून त्यामध्ये अक्षय देवलकर , हर्षील दाणी, अभिषेक कुलकर्णी, प्रसाद शेट्टी, कौशल धर्मामेर , नाइज़ेल डिसा, देवाशिष नावंदीकर, उत्कर्ष शिलवंत , अमेय जोशी, रोहित हे पुरुष तर नेहा पंडित, वैष्णवी भाले , रितिका ठक्कर, सिमरन सिंधी, मालविका बनसोड, रेवती देवस्थळे, मृण्मयी सावजी, संजना संतोष ह्यांचा समावेश आहे.
या स्पर्धेदरम्यान, मंगळवारी, दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीस बॅडमिंटन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आंतर जिल्हा वरिष्ठ मिश्र सांघिक गटांतील अंतिम सामन्यांचा पारितोषिक वितरण समारोह मंगळवारी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखाणी यांच्या हस्ते होणार आहे. अरुण लखाणी यांनी बॅडमिंटनच्या क्षेत्रांत अतुलनिय कामगिरी केली असून बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला राज्य सरकारकडून ७५ लाख रुपये तर गोपीचंद यांना २५ लाख रुपये मिळवून देण्याकामी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान जागृती शुगर्स चे संचालक दिलीप माने हे भूषविणार आहेत. राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवार, दि. २४ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजता लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी हे राहणार आहेत.
या सर्व स्पर्धा जागतिक बॅडमिंटन असोसिएशनच्या निकष व नियमांनुसार खेळविल्या जाणार आहेत. स्पर्धेदरम्यान बॅडमिंटन असो.च्या राज्य पातळीवरील पंचांची परीक्षाही संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या स्वागत व संयोजन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे आहेत. लातूरच्या क्रीडा वैभवात भर घालणाऱ्या या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बॅडमिंटनप्रेमींनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन इटनकर ,स्पर्धा समितीचे सचिव एड. आशिष बाजपाई , लातूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देशमुख, एस.एम.आर. स्विमिंग पूल चे अध्यक्ष राजेंद्र ,मालपाणी, प्राचार्य जोगेंद्रसिंह बिसेन आदिंनी केले आहे. स्पर्धेच्या आयोजनात दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी, सचिव रमेश बियाणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अभय शाह , कमलकिशोर अग्रवाल,प्रा. एन.एस.रेड्डी, आनंद लाहोटी, रवी शेट्टी , मनिष राठी , गुरुनाथ खुब्बा , आनंद बंग , आशिष सोमाणी, अनिल पांडे, आशिष अग्रवाल, डॉ.अशोक वाघमारे यांसह दयानंद महाविद्यालयाचे सर्व क्रीडा प्राध्यापक , कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
No comments:
Post a Comment