आता शासन साजरा करणार तरुणांचा वाढदिवस जिल्हाधिकारी जी .श्रीकांत यांचा नवा फंडा

Sunday, August 5, 2018



लातूर/ प्रतिनिधी: नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी लातूरचे जिल्हाधिकारी जी .श्रीकांत यांनी नवा फंडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार आता जिल्हाधिकारी कार्यालय अर्थात शासन नवमतदारांचा वाढदिवस साजरा करणार आहे .

पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत .त्यादृष्टीने नवे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र लातूरात दाखल झाले आहेत. मतदान करणाऱ्या मतदारांना पोचपावती देण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीन लातूर साठी आल्या आहेत .हे करत असतानाच नव्या मतदारांची नोंदणी केली जाणार आहे .ज्या तरुण-तरुणींनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत त्यांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावयाचे आहे .परंतु अनेकदा तरुणांची उदासीनता दिसून येते .यामुळे अनेक नवमतदार मतदानापासून वंचित राहतात. असे होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा फंडा राबविण्याचे ठरवले आहे.

 त्यानुसार  तरुण-तरुणींनी आपला अठरावा वाढदिवस लोकशाहीला अर्पण करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ज्या तरुण-  तरुणीचा अठरावा वाढदिवस आहे त्यांचा सत्कार केला जाणार आहे .एका अर्थाने शासन त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे .असे तरुण-तरुणी जिल्हाधिकारी कार्यालयात आले तर तेथे किंवा त्यांनी सूचना केली तर त्यांच्या महाविद्यालयात जाऊनही वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला जाणार  आहे .विशेष म्हणजे अशा तरुण-तरुणींना केक खरेदी करताना विशिष्ट दुकानदारांकडून 25 ते 30 टक्के सवलत दिली जाणार आहे .एवढेच नाही तर  वाढदिवसानिमित्त जो केक कापला जाणार आहे तो देखील निवडणूक चिन्हाची  प्रतिकृतीच असणार आहे. मतदार नोंदणीसाठी जिल्हाधिकारी जी .श्रीकांत यांनी आयोजित केलेला हा नवा फंडा तरुण-तरुणींना आकर्षित करणारा ठरणार आहे.

No comments:

Post a Comment