पत्रकार गौरी लंकेश हत्त्या प्रकरणी बाँब बनविण्याचे प्रशिक्षण घेणार्‍यात नांदेड येथील एकाचा समावेश

Wednesday, August 29, 2018


कर्नाटक एसआयटीचे पथक नांदेडात दाखल
विशेष प्रतिनिधी
नांदेड-कर्नाटकातील बंगरुळ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश हत्त्ये प्रकरणाच्या तपासात नांदेड कनेक्शन उघडकीस आल्यामुळे कर्नाटक एसआयटीचे पथक व मुंबई सीआयडीचे दोन अधिकारी नांदेड शहरात दाखल झाले आहेत. गौरी लंकेश हत्त्ये प्रकरणातील आरोपीचा थेट संबंध नांदेडशहराशी जोडला जात असल्याचे तपासात निष्पन्न होत असून बाँब बनविण्याचे प्रशिक्षण घेणार्‍या चार जणांत नांदेड मधील एका तरुणाचा संबंध असल्याची माहिती कर्नाटक एटीएस पथकाच्या हाती लागल्यामुळे हे पथक तपासासाठी नांदेडात दाखल झाले आहे.

पत्रकार गौरी लंकेश यांची हत्त्या गतवर्षी 5 सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून करण्यात आली होती. गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींनी वापरलेली दुचाकी ही नांदेड पासींगची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दुचाकीचा मुळ मालक नांदेड येथील असून आतापर्यंत ही दुचाकी दहा जणांनासोबत खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. या दुचाकीच्या मुळ मालकाचा शोध घेण्यासाठी हे पथक नांदेड शहरात दाखल झाले असून या पथकासोबतच मुंबई सीआयडीचेही दोन अधिकारी  नांदेडात दाखल झाले असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

महाराष्ट्रातील थोर समाजसेवक नरेंद्र दाभोलकर हत्त्या प्रकरणी पोलिसांनी कांही जणांना ताब्यात घेतले आहेत. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, कलबुर्गी,कॉ. पानसरे यांच्या हत्त्ये प्रकरणात या आरोपींचा समावेश जुळत असल्यामुळे या चारही हत्त्येचा तपास वेगवेगळ्या पध्दतीने सुरु आहे. या हत्त्ये प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अमोल काळे व त्याच्या कांही साथीदारांची विशेष पथकाकडून कसुन चौकशी सुरु आहे.

विशेष पथकाच्या चौकशीत आरोपींनी जालना जिल्ह्यातील एका फार्महाऊसवरील एका कोरड्या विहिरीत क्रुड बाँबचा स्फोट घडवून त्या बाँबची क्षमता तपासण्यात आली होती असेही तपासात निष्पन्न झाले आहे. बाँब बनविण्याचे प्रशिक्षण घेणार्‍या ज्या चार जणांत नांदेडमधील एकाचा समावेश असल्याची दाट शक्यता तपास यंत्रणेला वाटल्यामुळे हे एटीएसचे पथक नांदेड शहरात दाखल झाले आहे. नांदेड शहरात यापूर्वीही गावठी बॉम्बचा स्फोट घडला होता. धर्माबाद शहरातही बाँब स्फोट झाल्याचे एटीएसच्या तपासात यापूर्वी आढळून आल्यामुळे पुन्हा या प्रकरणाची कसून तपासणी करण्यासाठी हे पथक नांदेड शहरात दाखल होत असल्याचे वृत्त हाती आले आहे. गौरी लंकेश हत्त्ये प्रकरणाचे नांदेड कनेक्शन लवकरच उजेडात येईल असा दावा करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment