पुरावे आहेत म्हणूनच विचारवंतांना अटक - पोलिस

Friday, August 31, 2018

मुंबई :भीमा कोरेगाव येथील हिंसाचार प्रकरणी सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत .या पुराव्यांच्या आधारेच पुणे पोलिसांनी डाव्या विचारवंतांना अटक केली असल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले .

परमवीर सिंग यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधून संपूर्ण घटनाक्रम त्यांच्यासमोर मांडला . भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांनी वरवरा राव ,अरुण फरेरा, गौतम नवलखा, वेर्नोन गोनसाल्विस आणि सुधा भारद्वाज या पाच जणांना अटक केली आहे .या अटके प्रकरणी विविध बाजूंनी चर्चा सुरू होती .परमवीर सिंग यांच्या स्पष्टीकरणानंतर आता ही चर्चा थांबणार आहे.

परमवीर सिंग म्हणाले की, पोलिसांनी कसून तपास केला. हजारो ई-मेल तपासले .अनेक संगणकांची तपासणी केली. यातून महत्त्वाची माहिती हाती लागली. त्यानंतरच पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी केली .छापे मारल्यानंतर त्या ठिकाणाहून साहित्य जप्त करण्यात आले आहे. या साहित्याची फॉरेंसिक लॅब मधून तपासणी करून घेतली जाणार आहे.

अनेक महत्त्वाची पत्र पोलिसांना सापडली आहेत .त्यावरून या विचारवंतांचा माओवाद्यांशी संपर्क असल्याचे स्पष्ट होत आहे .राज्यात हिंसाचार घडवून कायदा व सुव्यवस्था बिघडवणे आणि त्यानंतर सरकार उलथवण्याचे कारस्थान रचले गेले होते. हिंसाचार घडविण्यासाठी माओवाद्यांना पैसाही पुरविण्यात येत होता .या कामासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी पुरविल्याचे स्पष्ट झाले असल्याचेही अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी सांगितले .त्यांनी पत्रकारांसमोर काही पुरावेही सादर केले.


No comments:

Post a Comment