चार कामचुकार कंत्राटदार काळ्या यादीत, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Friday, August 10, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
जलयुक्त शिवार अभियान 2017-18 अंतर्गत वसमत उपविभागातील औंढा व वसमत तालुक्यातील गावांमधील जलसंधारणाची कामे करण्यासाठी निविदा धारकांना कार्यारंभ आदेश काढले होते. विहीत कालावधीत कामे करण्याच्या सुचना असताना सुद्धा त्या मुदतीत काम सुरू न केल्याने या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांची अनामत जप्त करण्यात यावी असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी 31 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठविला होता. या प्रस्तावाची दखल घेत आज शुक्रवारी चार कामचुकार कंत्राटदार काळ्या यादीत टाकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

वसमत उपविभागीय कार्यालयाअंतर्गत सन 2017-18 जलयुक्त शिवार अभियानाबाबत निविदा काढण्यात आल्या होत्या. यामध्ये वसमत व औंढा नागनाथ तालुक्यांचा समावेश आहे. कंत्राटदारांनी आपल्या संस्थेच्या नावे हे काम घेतले होते. पण या कामाची प्रत्यक्ष चाचपणी केली असता तालुका कृषि अधिकारी वसमत व तालुका कृषि अधिकारी औंढा नागनाथ यांच्या अहवालावरून विहित मुदतीत काम सुरू न केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी याची चौकशी करून कार्यवाहीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. यावर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करत प्रल्हाद विश्वनाथ टोगे हिंगोली 13 कामे, विश्वास जाधव नाथबाबा ट्रस्ट कनका 5 कामे, विश्वकर्मा मजुर सहकारी संस्था मर्या. लोहगाव 1 काम, रोहित लक्ष्मणराव बोलेनवार 4 कामे या चार कामचुकार कंत्राटदार काळ्या यादीत टाकून अनामत जप्त कण्याचे आदेश काढले आहेत.

 यामुळे बाकीच्या कंत्राटदारात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर उर्वरित वसमत विभागातील एकता मजुर सहकारी संस्था दारेफळ 2 कामे, रोकडेश्वर मजुर सहकारी संस्था पांगरा शिंदे 2 कामे, बालाजी मजुर सहकारी संस्था कोर्टा 2 कामे, रामसिंग मजुर सहकारी संस्था मर्या. साखरा 1 काम, महाराणा प्रताप मजुर सहकारी संस्था मर्या. भंडारी 1 काम, प्रियदर्शनी मजुर सहकारी संस्था मर्या. ढेगज 1 काम यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment