कोलकाता:
लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं आज सकाळी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सोमनाथ चॅटर्जी हे गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त होते. हा विकार बळावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
लोकप्रिय खासदार
एक उत्कृष्ट संसदपटू असणारे चॅटर्जी हे प्रथितयश वकील आणि लोकप्रिय खासदारही होते. १९७१ ते २००९ या काळात केवळ एक अपवाद वगळता ते सातत्याने लोकसभेवर निवडून गेले. १९८४ मध्ये ममता बॅनर्जी यांनी त्यांना पराभूत केले होते. १० वेळा खासदार
सोमनाथ चॅटर्जी हे भारतीय हिंदू महासभेचे संस्थापक सदस्य असलेले सुप्रसिद्ध वकील निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे चिरंजीव. मात्र, राजकीय जीवनाची सुरुवात त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून १९६८ साली केली. त्यानंतर २००८ पर्यंत ते पक्षासोबत होते. १९७१ साली पहिल्यांदा खासदार झालेल्या चॅटर्जी यांनी नंतर मागे वळून पाहिलंच नाही. तब्बल दहा वेळा ते देशाच्या लोकसभेत निवडून गेले. संपूर्ण राजकीय कारकिर्दीत चॅटर्जी यांना एकच पराभव पत्करावा लागला होता. १९८४मध्ये जादवपूर मतदारसंघातून त्यांना ममता बॅनर्जी यांनी मात दिली होती.

No comments:
Post a Comment