जिल्हयातील 1 लाख 40 हजार शेतकऱ्यांना 381 कोटीची कर्जमाफी : पालकमंत्री निलंगेकर

Wednesday, August 15, 2018

  • जन आरोग्य योजनेचा दुर्बल घटकातील 37 हजार रुग्णांना लाभ 
  • जलयुक्तमुळे 48 हजार टीसीएम साठवण क्षमता नव्याने निर्माण
  • युवा माहिती दूत लोगोचे आनावरण
  • पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
लातूर, दि 15- महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत एक हजार पेक्षा अधिक आजारांचा समावेश असल्याने सर्वसामान्य व दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी ही योजना वरदान ठरली आहे.जिल्हयातील 13 रुग्णांलयांच्या माध्यमातून हया योजनेचा लाभ 37 हजार रुग्णांना देण्यात आलेला आहे. संबंधीत प्रत्येक रुग्णालयात एका आरोग्यमित्राची नेमणूक करण्यात आल्याने सर्वसामान्यांना योजनेचा लाभ सुलभ रितीने मिळत आहे,असे प्रतिपादन कामगार कल्याण,कौशल्य,भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.05वा.मुख्य शासकीय ध्वजारोहणा प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे,माजी खासदार रुपाताई पाटील,महापौर सुरेश पवार,जिल्हाधिकारी जी.श्रीकांत,मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, अतिरीक्त पोलीस अधिक्षक काकासाहेब डोळे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक,निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे,परिविक्षाधीन जिल्हाधिकारी राहूल गुप्ता,जिल्हा परिषद उपाध्य्क्ष रामचंद्र तिरूके,उपजिल्हाधिकारी प्रताप काळे,उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,जनार्धन विधाते,तहसिलदार संजय वारकड आदिसह स्वातंत्र्य सेनानी,ज्येष्ठ नागरिक, पालक,विद्यार्थी, पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ही दिनांक 28 जून 2017 रोजी जाहीर करुन राज्यातील 77 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटीची कर्जमाफी देण्याचा एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेऊन राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या अंतर्गत लातूर जिल्हयातील 1 लाख 40 हजार 550 शेतकऱ्यांना 381 कोटी 62 लाखाची कर्जमाफी देण्यात आली असून उर्वरित सुमारे 13 हजार शेतकऱ्यांना दीड लाखापेक्षा अधिकची रक्कम एक रक्कमी परतफेड योजनेंतर्गत भरण्यासाठी शासनाने 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तरी या मुदतवाढीचा लाभ जिल्हयातील शेतकऱ्यांनी घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी राज्यशासनाने जलयुक्त शिवार अभियान हा अत्यंत महत्वकांक्षी उपक्रम सुरु केला. या अंतर्गत लातूर जिल्हयातील 943 गावांमध्ये जलसंधारणांची विविध कामे करुन ही सर्व गावे पाणीदार करण्यात येणार असून अभियानाच्या तीन टप्प्यात 520 गावांमध्ये 11 हजार 189 कामे पूर्ण झालेली असून या कामांमुळे 48 हजार 258 टीसीएम पाणी साठवण क्षमता नव्याने निर्माण करण्यात आलेली आहे.यामुळे एक संरक्षित सिंचन दिल्यास 97 हजार 716 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. व मागील दोन वर्षात जिल्हयात एक ही टँकरची आवश्यकता पडली नाही.हेच या अभियानाचे यश आहे. सन 2018-19 मध्ये 153 गावांची जलयुक्त्‍ मध्ये निवड होऊन 2 हजार 704 कामे प्रस्तावित करण्यात आली असून यातील बहुतांश कामे सुरु झालेली आहेत,असे निलंगेकर यांनी सांगितले. 

महाराष्ट्र शासन व जागतिक बँक संयुक्तपणे शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्येशाने जिल्हयामध्ये नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबवित असून यामध्ये जिल्हयातील 282 गावांची निवड केलेली आहे.त्यापैकी चालूवर्षी 92 गावांची निवड केली असून कृषि विषयक कार्यक्रम राबविले जात आहेत. तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे.या योजने अंतर्गत सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध्‍ केली असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निलंगेकर यांनी केले.

लातूर जिल्हयातील नागरिकांच्या मनामध्ये जाज्वल्य राष्ट्रभावना नेहमी जागृत राहावी या करिता जिल्हा क्रिडा संकुलच्या परिसरात 45 मिटरचा ध्वजस्तंभ निर्माण केला जाणार आहे.तसेच लातूर जिल्हयातील 45 गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेसाठी सौर पंप बसविण्यात आल्याने त्या गावांना कायमस्वरुपी अखंडितपणे पाणी पुरवठा होणार आहे. 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेर्तगत 43.75 लाख वृक्ष लागवड करण्यात आली. असून लातूर जिल्हा हरितसेना महाराष्ट्र अभियानांतर्गत ग्रीन आर्मीच्या नोंदणीत 5 लाख सदस्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर आसल्याची माहिती निलंगेकर यांनी दिली.

अनेक थोर नेत्यांनी या स्वतंत्र भारतातील लोकशाही व्यवस्थेची मजबूत पायाभरणी केली. त्यांच्यासह इतर अनेक महनीय नेत्यांना स्वतंत्र भारताचे स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी मोठा लढा दयावा लागला तर अनेकांना आपल्या प्राणांची आहुती दयावी लागली. त्या सर्व महान नेत्यांना व स्वातंत्र्य सेनानींना निलंगेकर यांनी अभिवादन करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 71 वा वर्धापन दिन आज संपूर्ण देशात उत्साहाने साजरा होत आहे.या शुभप्रसंगी ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक,जेष्ठ नागरिक,लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी, पालक,पत्रकार यांना निलंगेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी परेड कमांडर पोलिस उपअधिक्षक गणेश किंद्रे यांच्यासमवेत पालकमंत्री निलंगेकर यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर परेडचे संचलन झाले. तसेच विविध विभागांनी शासकीय योजनांची माहिती चित्ररथाव्दारे सादर केली. यावेळी निलंगेकर यांच्या हस्ते पोलिस,शिक्षण,उदयोग, स्वच्छता विभागांच्या पुरस्काराचे वितरण तसेच गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  उध्दव फड यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव,तहसिलदार श्री. पाटील,गोविद माने,आदिंनी परिश्रम घेतले.
* युवा माहिती दूत लोगोचे अनावरण *
युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहकार्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय युवा माहिती दूत हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाच्या लोगोचे आनावरण पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

महाविद्यालयीन विदयार्थ्यांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा मुख्य उद्देश युवा माहिती दूत उपक्रमाचा आहे. किमान एक लाख विदयार्थ्यांना माहिती दूत करुन दोन ते अडीच कोटी सर्वसामान्य प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्याचा उद्देश आहे.

No comments:

Post a Comment