नांदेड/प्रतिनिधी-नांदेड शहर व परिसरात गेल्या चोवीस तासात झालेल्या दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. सर्वदूर झालेल्या पावसाने शेतकर्यांसह सामान्य नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात पासून असलेल्या पावसाने कोणतीही जिवीत हानी झाल्याचे वृत्त नाही.
नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेणार या पावसाने आज जोरदार हजेरी लावली. रात्रीपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाच्या सरी बरसत होत्या. पावसाने दडी मारल्याने चिंतातुर झालेल्या शेतकर्यांसह सामान्य नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. देगलूर, बिलोली, किनवट, माहूर, हिमायतनगर, अर्धापूर, उमरी, धर्माबाद, लोहा, कंधार आदी भागात पावसाने दमदार हजेरी लावली.
नांदेड शहरात रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले होते. शहरातल्या श्रीनगर, सहयोग नगर, प्रभात नगर, दत्तनगर, नंदिग्राम सोसायटी आदी भागात पाणीच पाणी झाले. हिंगोली गेट कडून आनंदनगर कडे जाणार्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांची चांगलीच कसरत झाली. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आगामी २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने महापालिकेनेही आवश्यकता उपायोजना सुरू केल्या आहेत. ज्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते तेथील पाण्याचा उपसा करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ते निर्देश दिले आहेत. काही भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मनपाने काही शाळांची माहितीही घेतली.
गेल्या चोवीस तासात झालेल्या सतत धार पावसाने छोट्या-मोठ्या प्रकल्पातील पाणी पातळीत काही अंशी वाढ झाली आहे. गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात अपेक्षित पाऊस न पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणार्या विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा वाढला नाही. या प्रकल्पात आजमितीस ३५% पाणी साठा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ झाली असली तरी जिल्ह्यातल्या अन्य प्रकल्पातील पाणीसाठा अजूनही गंभीर आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल असे मानले जाते.
जिल्ह्यात सोमवार रोजी सकाळी ८ वा. संपलेल्या गत २४ तासात सरासरी ७.८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण १२६.०१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३८१.५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४०.०९ टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात १६ जुलै २०१८ रोजी सकाळी ८ वा. संपलेल्या २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- २.६३ (४१३.५६), मुदखेड- २.०० (५३४.०१), अर्धापूर- २.६७ (३७७.०१), भोकर- ३.७५ (५३१.५०), उमरी- १७.०० (४०७.९८), कंधार- ३.३३ (३७१.६६), लोहा- ७.०० (३८८.६५), किनवट- २२.०० (३७९.९८), माहूर- ३३.५० (५१९.५०), हदगाव- ९.५७ (५१४.८८), हिमायतनगर- ८.६७ (४९७.०२), देगलूर- ०.३३ (१४२.३३), बिलोली- १.०० (२४६.४०), धर्माबाद- ८.३३ (२८५.९८), नायगाव- ३.८० (२९६.२०), मुखेड- ०.४३ (१९७.४०). आज अखेर पावसाची सरासरी ३८१.५० (चालू वर्षाचा एकूण पाऊस ६१०४.०६) मिलीमीटर आहे.
No comments:
Post a Comment