रिमझिम पावसात हजारो शिवप्रेमींनी केले छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे स्वागत

Monday, July 16, 2018
छत्रपती शिवाजी महाराज की जय... जयघोषाने शहर दणाणले 
हिंगोली / प्रतिनिधी
गेल्या कित्येक वर्षापासून जिल्ह्याचे ठिकाणी असलेल्या हिंगोली शहरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व्हावा अशी शिवप्रेमींची इच्छा होती. अखेर कोल्हापूरला तयार करण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा 15 जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात दाखल झाल्याने डोंगरकडा, वारंगा, बाळापूर, माळेगाव, कळमनुरी, खानापूर यासह हिंगोली शहरात रात्री आठ वाजता अग्रसेन चौकात रिमझिम पावसात हजारो शिवप्रेमींनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. शहरात सकाळपासूनच शेकडो शिवप्रेमींनी गर्दी केली होती.


गेल्या वर्षभरापासून हिंगोली येथे बसविण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम कोल्हापूर येथे सुरू होते. छत्रपतींचा हा पुतळा शिल्पकार चौगुले यांनी तयार केला असून हा पुतळा पुर्णत्वाला आल्यानंतर 13 जुलै रोजी छत्रपती शिवराय पुर्णाकृती समिती कोल्हापूरला दाखल झाली होती. त्यानंतर कोल्हापूरहून हा पुतळा 14 जुलै रोजी लातूर-नांदेड मार्गे हिंगोलीकडे आणण्यात आला. 15 जुलै रोजी दुपारी हिंगोली जिल्ह्यात शिवरायांच्या पुतळ्याचे आगमन झाले. त्यानंतर ठिकठिकाणी छत्रपतींच्या स्वागतासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. डोंगरकडा, वारंगा फाटा, बाळापूर, माळेगाव, कळमनुरी, खानापूर या ठिकाणी स्वागत झाल्यानंतर छत्रपतीं शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे रात्री आठ वाजता अग्रसेन चौकात आगमन झाले. 


रिमझिम पाऊस सुरू असतानाही राजेंच्या स्वागतासाठी हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती. शिवरायांच्या पुतळ्याची शहरात ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुक काढण्यात आली. अग्रसेन चौक, इंदिरा चौक, महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, पोस्ट ऑफीस मार्गे शासकीय विश्राम गृहाच्या बाजुला असलेल्या नियोजित जागी हा शिवरायांचा पुतळा आणण्यात आला. हजारो शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत आनंद शतगुनित केला. शिवप्रेमींच्या या घोषणामुळे रविवारच्या दिवशीही हिंगोली शहर दणाणून गेले होते. 

बहुजन प्रतिपालक महापराक्रमी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा हिंगोलीत पाहिल्यानंतर अनेक शिवभक्तांना आपले आनंद अश्रु आवरता आले नाही. स्वागतासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या मंडळींचीही उपस्थिती होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

No comments:

Post a Comment