कॉंग्रेसवाले सरळसरळ खात होते अन् मोदी सरकारमध्ये कॉर्पोरेट करप्शन सुरू - ऍड. प्रकाश आंबेडकर
लातूर / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्ष सध्या घराणेशाहीच्या जोखडात अडकलेला आहे. त्यांनी गांधीवाद सोडला आहे. कॉंग्रेसने घराणेशाही सोडून गांधीवादाकडे परतावे तेव्हाच त्यांच्याशी समझोता शक्य असल्याचे मत भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. भ्रष्टाचाराच्या बाबतीत कॉंग्रेसवाले सरळसरळ खात होते अन् मोदी सरकारमध्ये कॉर्पोरेट करप्शन सुरू असल्याची टिका यावेळी त्यांनी केली.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर धनगर, भटके विमुक्त, माळी अशा वंचित समुहाचे एकत्रिकरण, संघटन करणे सुरू आहे. असे बोलून ऍड. आंबेडकर म्हणाले, सत्ता ही प्रश्नांची गुरूकिल्ली आहे. यासाठी महाराष्ट्रातील सत्ता हातात घ्यायचे आम्ही निश्चित केले आहे. त्या दृष्टीने राज्यभरात बैठका घेत आहोत. वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे.
तर बोलणीस तयार
स्वत:ला सेक्यूलर म्हणारे सध्या एकत्र या अशी बोंब मारत आहेत. त्यांनी तिकीट वाटपात वंचितांना प्रतिनिधीत्व द्यावे, त्यांची तशी मानसिकता असेल त्यांचे सोबत बोलण्यास तयार आहोत. महिनाभर वाट पाहू अन्यथा स्वत:ची तयारी सुरू असा इशारा आंबेडकर यांनी कॉंग्रेसला दिला. लोकशाहिचे सामाजिकरण व्हावे हे आमचे उद्दीष्ट आहे. त्याची सुरूवात वंचितांना उमेदवारी देवून राजकीय पक्ष करू शकतात. सोबतच पक्ष पातळीवर लोकशाहीचे सामाजिकरण व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भाजपचा कॉर्पोरेट भ्रष्टाचार
कॉंग्रेस सरकारच्या काळात खाण्याची पद्धत वेगळी होती. कॉंग्रेसवाले सरळसरळ खात होते. पण भाजप सरकार मध्ये कॉर्पोरेट करप्शन सुरू आहे. त्यातून सारी व्यवस्था खराब होते अशी टिपणी करून ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी फ्रान्सकडून रॉफेल विमाने खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. रॉफेल खरेदीचा मनमोहन सिंग यांच्या काळातील प्रस्ताव लोकांसमोर आहे. आता मोदी सरकारने रॉफेलची किंमत जाहीर करावी. 136 विमानांपैकी 36 विमाने तात्काळ फ्रान्सकडून आणि उर्वरित 100 विमाने रिलायन्स मार्फत भारतात निर्मीती करण्यात येणार असल्याची सांगितले जाते. रिलायन्सकडे विमान निर्मीतीचा कारखाना नाही. तो 4 वर्षात उभा राहू शकत नाही मग विमान निर्मीती कशी होईल ते सरकारने सांगावे असे आव्हान आंबेडकर यांनी मोदी सरकारला दिले. कॉर्पोरेट हाऊसनी मोठ्या प्रमाणात भाजपाला निधी दिला आहे. त्यांची चौकशी निवडणूक आयोगाने करावी अशी मागणी करून प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी जगभर फिरले परंतू, त्यातून काय साध्या झाले याबाबत आरएसएसने आलेख मांडावा आम्ही त्यावर भाष्य केले तर टिकाच मानली जाते असे स्पष्ट केले. पत्र परिषदेस ऍड. विजय मोरे, प्रा. सुभाष भिंगे, हरीभाऊ घरे, प्रा. अविनाश डोळस उपस्थित होते.
Attachments area

No comments:
Post a Comment