असे उभे राहणार भव्य-दिव्य स्मारक, शिवप्रेमींची उत्कंठा शिगेला
हिंगोली / प्रतिनिधी
गेल्या कित्येक दिवसांपासून जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या हिंगोली शहरात अश्वारूढ छत्रपती शिवरायाचा पुर्णाकृती पुतळा व्हावा अशी मागणी शिवप्रेमींतून होत होती. गेल्या वर्षभरापासून येथील शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला चालू असलेले छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्यात आले आहे. छत्रपतींचा पुतळ्याचे कामही पुर्ण झाले आहे. हा पुतळा १० जुलै रोजी कोल्हापुरवरून हिंगोली येथे विशेष वाहनाने आणण्यात येणार आहे. यासंदर्भात येथील शासकीय ३० जुलै रोजी बैठक संपन्न झाली.
गेल्या २० वर्षापासून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हिंगोली येथे छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी प्रयत्न चालविले होते. तमाम जिल्हाभरातील शिवप्रेमींची ही इच्छा आता पुर्णत्वास येत आहे. याबाबत गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्याने शिवप्रेमीतही उत्साहाचे वातावरण संचारले आहे. महाराष्ट्रातील नामवंत शिल्पकार संताजी चौगुले यांनी हा अश्वारूढ पुतळा कोल्हापूर येथे तयार केला आहे. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा १८ लाख ५० हजार रूपयांत पुतळा तयार झाला आहे. पंचधातूपासून हा पुतळा पुर्णत्वास आला आहे. या पुतळ्याची उंची ११.५ फुट आहे. तर चबुतर्याची उंची १७ फुट एवढी आहे. या अश्वारूढ पुतळ्याचा अंतिम नकाशा तयार करण्यात आला असून यामध्ये अद्यावत मांडणी केली आहे. छत्रपती शिवरायांच्या चबुतर्याजवळ कारंजे, धबधबा, आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. पुतळ्याच्या पाठीमागे किल्याची प्रतिकृती उभारली जाणार आहे. पुतळ्याच्या चहुबाजूने विशेष डिझाईनींग केलेले गार्डन तयार करण्यात येणार आहे. या पुतळ्यासाठी लागणार्या शासकीय अंतिम मान्यता पुर्ण झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून शिवप्रेमींनी पाहिलेले हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत असल्याने कधी हिंगोलीत छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा दाखल होतो ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, याबाबत छत्रपती शिवराय पुर्णाकृती समितीची बैठक ३० जुलै येथील शासकीय विश्राम गृहात पार पडली. पुतळ्यासंदर्भातल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ही समिती ७ जुलै रोजी हिंगोलीवरून कोल्हापूर येथे दाखल होणार आहे. त्यानंतर शिवरायांचा पुतळा कोल्हापूर येथून एका विशेष वाहनाने हिंगोली येथे १० जुलै रोजी आणण्यात येणार आहे. अशी माहिती पुतळा समितीचे सचिव त्र्यंबकराव लोंढे यांनी दिली आहे. या बैठकीला आ.तानाजीराव मुटकुळे, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, खंडेराव सरनाईक, प्रा. विक्रम जावळे, त्र्यंबकराव लोंढे, डॉ. प्रल्हाद शिंदे, ऍड. के.के. शिंदे, प्रकाश बांगर, नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment