मुखेड तालुक्यात गारपीट 500 कोंबड्या, म्हैस-शेळी ठार

Friday, June 22, 2018

नांदेड जिल्ह्यात वीज कोसळून 4 ठार; 3 जण जखमी

प्रल्हाद उमाटे
नांदेड-वीज कोसळून जिल्ह्यात 4 जण ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुखेड तालुक्यात वादळी वार्‍यासह गारपीट होवून झालेल्या पावसात वीज कोसळून 500 कोंबड्या, एक म्हैस व शेळी दगावली असल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. वीज कोसळून चार जण ठार झालेल्यांत किनवट तालुक्यातील चिमुकली बहिण-भावाचा समावेश आहे.

गारपीटमृगनक्षत्राची सुरुवात दमदार पावसाने झाल्यानंतर गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरुवार दि. 21 जून 2018 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमार ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. प्रचंड वीजेचा कडकडाट, तुफान वादळी वार्‍यासह जिल्ह्यातील कांही गावांत पाऊस पडला आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर वीज कोसळून किनवट तालुक्यात बहिण-भाऊ, देगलूर तालुक्यातील केदारकुंठा येथे एक तर कंधार तालुक्यातील चुडाजी वाडी येथे वीज कोसळून एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. शहरातील सिडको परिसरातील राहूलनगर येथे वीज कोसळून 2 जण गंभीर जखमी झालेआहेत.

किनवट तालुक्यातील मलकापूर येथील लवसींग जाधव यांची मुलगी शालीनी जाधव (8) व मुलगा हेमंत जाधव (10) हे दोघे दुपारी शाळेतून घरी आले होते. या मुलांची आई शेतात काम करीत असल्यामुळे वडीलाने या मुलांना शेतात घेवून जावून आईकडे सोडले. आई शेतात काम करीत असताना इयत्ता चौथ्या वर्गात शिकणारा संतोष व दुसर्‍या वर्गात शिकणारी त्याची बहिण शालीनी हे दोघे शेतातील लिंबाच्या झाडाखाली खेळत होते. सायंकाळी साडेचार-पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात होताच वीजेचा प्रचंड कडकडाट होवून वीज त्या लिंबाच्या झाडावर कोसळल्यामुळे हे दोघे चिमुकले बहिण-भाऊ जागीच ठार झाले. हे भयानक दृष्य शेतात काम करीत असलेली आई आपल्या उघड्या डोळ्याने बघून ती जागीच बेशुध्द झाली.
देगलूर तालुक्यातील केदारकुंठा येथील शेतकरी मारोती केशवराव बार्‍हाळे (50) हे शेतात काम करीत असताना दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्यामुळे ते आश्रयासाठी शेतातील झाडाखाली थांबले असता झाडावर वीज कोसळून मारोती बार्‍हाळे हे जागीच ठार झाले. पावसाळा सुरु झाला असला तरी अवकाळी पावसासारखा पाऊस नांदेड जिल्ह्यात पडत आहे. एका शेतात पाऊस पडतो तर बाजूच्या शेतात पावसाचे थेंबही पडत नाही अशी विचित्र परिस्थितीचा पाऊस देगलूर तालुक्यात पडत आहे. या प्रकरणी प्रभारी तहसीलदार नरवाडे यांनी घठनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी नायब तहसिलदार व्यंकट गोविंदवार, मंडळ अधिकारी दादाराव मोरे यांना पाठविण्यात आले असल्याचे सांगितले.

कंधार तालुक्यातील पेठवडज परिसरातील चुडाजीवाडी येथे वीज कोसळून उध्दव विक्रम मुंडकर (27) हा तरुण जागीच मरण पवाला तर त्याची काकू इंदू गोविंदराव मुंडकर (50) ही महिला गंभीर जमखी झाली. ही घटना गुरुवारी सायंकाळी 5 वाजता घडली. पाऊस पडत असल्यामुळे हे दोघेही गुराच्या गोठ्यात थांबले असता गोठ्यावर वीज कोसळली. कुरुळा परिसरात वीज कोसळून एक गाय दगावली असल्याचे वृत्त हाती आले आहे. नांदेड शहरातील सिडको परिसरातील राहूलनगर येथे वीज कोसळून दोन जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
मुखेड तालुक्यातील बार्‍हाळी परिसरात तुफान वादळी पाऊस व गारपीट झाली. पावसाला सुरुवात झाल्यानंतर विजेचा कडकाट मोठ्या प्रमाणात सुरु होता. तालुक्यातील दडवाडी येथे एका पोल्ट्रीफार्मवर वीज कोसळून 500 ते 600 कोंबड्या मरण पावल्या आहेत. बार्‍हाळी येथे एक म्हैस व शेळी दगावली असल्याचे वृत्त हाती आले आहे. पाऊस कमी वीजेचा कडकडाट जास्त असल्यामुळे वीज कोसळून जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेत 4 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले असून कोंबड्यासह जनावर दगावली आहेत.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment