कॉंग्रेसचा भ्रमाचा भोपळा फुटला-उपमहापौर काळे
लातूर/प्रतिनिधी - ,=. सन 2013-14 मधील मनपाचा विविध योजनेचा अखर्चित 17.86 कोटी रुपयांचा निधी मार्च 2019 पर्यंत खर्च करण्यास महाराष्ट्र शासनाने मंजूरी दिली आहे. अखर्चित निधी परत जात असल्यामुळे सत्ताधारी भाजपाला निष्क्रीय म्हणणाऱ्या कॉंग्रेसच्या भ्रमाचा भोपळा यामुळे फुटला असल्याचा पलटवार उपमहापौर देविदास काळे यांनी केला आहे.
लातूर महानगर पालिकेस विविध योजनासाठी सन 2013-14 साली निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी 17.86 कोटी रुपय निधी अखर्चित होता. हा निधी खर्च न झाल्यामुळे तो परत करावा असे पत्र राज्य शासनाने पाठविले होते. त्यावरुन विरोधी कॉंग्रेस पक्षाने सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडून निष्क्रीय असल्याचा आरोप केला होता. परंतू हा निधी परत जावू नये यासाठी पक्ष आणि प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत होते. यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यांनी पुढाकार घेतला होता. यामुळे राज्य शासनाने हा अखर्चित निधी परत न घेता 31 मार्च 2019 पर्यंत खर्च करण्यास परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे अव्वर सचिव विवेक कुंभार यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना पत्र दिले असून विहित मुदतीत हा निधी खर्च करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
विरोधी कॉंग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी कोणताही मुद्दा हाती नसल्यामुळे भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी ते मुद्याच्या शोधात आहेत. त्यामुळे अखर्चित निधीचा विषय त्यांनी लावून धरला होता. या माध्यमातून पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मुळात हा निधी कॉंग्रेसच्या काळातच अखर्चित राहिला होता. भाजपाने हा निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळवून घेतली. त्यामुळे कॉंग्रेसचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे असा पलटवार उपमहापौर देविदास काळे यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment