लातूर, दि. ०९ : आज प्रत्येक व्यक्तीचा ओढा ईश्वराच्या भक्ती , आराधनेऐवजी भौतिक सुखाच्या दिशेने असल्याचे पाहावयास मिळते. मात्र , मनुष्याच्या इच्छांची पूर्ती कधीही होत नसते. त्यासाठी इच्छापूर्तीच्या मागे धावण्याचे सोडून प्रत्येकाने चिरंतन समाधान, सुखाच्या प्राप्तीसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग अवलंबणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन हुमनाबादच्या श्री माणिकप्रभू संस्थानचे पिठाधिपती डॉ. ज्ञानराज माणिकप्रभू महाराज यांनी केले.
लातूर येथील श्री माणिकप्रभू संप्रदाय मंडळाच्या आयोजित करण्यात आलेल्या श्री माणिक पंचरात्रोत्सव सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशीच्या आशिर्वचनात उपस्थित प्रभू भक्तांना मार्गदर्शन करतांना डॉ. ज्ञानराज माणिकप्रभू महाराज पुढे म्हणाले की, दैनंदिन समाज जीवनात वावरतांना प्रत्येकजण आपआपले व्यवहार, नातेसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करीत असतो. असे नातेसंबंध जपण्यालाच शास्त्रीय भाषेत धर्माची उपमा दिली गेली आहे.
धर्माची व्याख्या विविध अंगांनी केली जाते. कोणी धर्माला स्वभाव असेही संबोधतात, ज्यामुळे समाज एका सूत्रात बांधला जातो. दैवी संपत्ती धारण करणारे जेवढ्या तन्मयतेने धर्मावर श्रद्धा ठेवतात, तेवढे असुरी संपत्ती धारण करणारे धर्मावर श्रद्धा ठेवताना दिसत नाहीत. समाजात अनेक लोक प्रत्यक्ष ईश्वराच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित करताना आढळून येतात. यासंदर्भातील वास्तव असे असते की, जे देवाचे अस्तित्वाबाबत प्रश्न, शंका उपस्थित करतात, त्यांनाही ईश्वर कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या रूपात आहे, याची कल्पना असते. कारण देव, ईश्वर कुठे आहे ? अशी विचारणा करणे, प्रश्न उपस्थित करणे म्हणजेच देवाचे अस्तित्व मान्य केल्यासारखे साठे. जी गोष्ट, वस्तू अस्तित्वातच नाही किंवा नसते, तिच्याबद्दल आपण प्रश्न उपस्थित करीत नसतो. हे सांगताना त्यांनी इंग्रजी भाषेतील एक वाक्य प्रस्तुत केले. गॉड इज नो व्हेअर ? म्हणजे देव कुठे आहे ,पण या वाक्यातील डब्ल्यू शब्द जर नो ला जोडला तर त्याचा अर्थ होतो, गॉड इज नाऊ हिअर , म्हणजे देव आता, याक्षणी इथेच आहे.
प्रज्ञान हे ब्रह्म असून ते चैतन्य रूपाने आपल्या सगळ्यात आढळून येते. त्याच्यामुले आपणास रूप, गंध, रस, शब्दाचे ज्ञान प्राप्त होते. समाजात आपण ज्यांना अल्पबुद्धीचे असे संबोधतो, त्यांची बुद्धी छोट्या वस्तूंकडे जात असते. त्यांना देव दिसत दिसत नाही. अल्पबुद्धी असणारे जगाच्या विनाशाला कारणीभूत ठरत असतात. समाजात आज भौतिकसुखाची लालसा प्रत्येक जण बाळगून चालतो. भौतिकवादाच्या चक्रव्यूहात अडकलेल्याना देव दिसत नाही. त्यांना स्वतःच्या धर्माबद्दलही अनास्था असते. जो ईश्वराचे अस्तित्व मानत नाही असे द दर्शवतो, त्याच्यातही चैतन्यरुपी ईश्वराचा अंश असतोच. म्हणजेच प्रत्येकजण सुप्त अंतःकरणाने ईश्वराचे अस्तित्व मान्य करून चालत असतो, असेही डॉ. ज्ञानराज माणिकप्रभू महाराजांनी सांगितले
No comments:
Post a Comment