लातूर जिल्‍हयाला २३४ कोटी पिक विमा

Sunday, June 10, 2018


पालकमंत्र्यांनी  घेतली मुंबईत बैठक बुधवार पासून वाटपास प्रारंभ
लातूर/प्रतिनिधी:-लातूर जिल्‍हयाला पिक विमा मिळत नसल्‍याच्‍या शेतक-यांच्‍या तक्रारी होत्‍या. त्‍यांची दखल घेत पालमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी मुंबईत विमा कंपनीच्‍या अधिक-यांसोबत बैठक घेवून लातूर जिल्‍हयास पिक विमा तात्‍काळ वाटप करण्‍याचे निर्देश दिले. यामुळे जिल्‍हयातील शेतक-यांना २३४ कोटी रूपये पिक विमा म्‍हणुन प्राप्‍त होणार असून येत्‍या बुधवार पासून त्‍याचे वाटप सुरू होणार आहे.
   
राज्‍यातील इतर जिल्‍हयांना पिक विमा मिळत असताना लातूर जिल्‍हयातील शेतकरी त्‍यापासून वंचित होते. बहुतांश शेतक-यांनी पिक विम्‍याचा हप्‍ता ठराविक वेळेत भरलेला होता. तरीही विमा मिळत नसल्‍याने शेतकरी चितेंत होते. ही बाब लक्षात आल्‍यानंतर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीचे क्षेत्रीय प्रबंधक एस.राजगोपालन, विभागीय व्‍यवस्‍थापक सचिन महाडिक यांच्‍या समवेत मुंबईत बैठक घेतली. यावेळी क्षेत्रीय प्रबंधकांनी लातूर जिल्‍हयाला पिक विमा वाटप करण्‍यासाठी तांत्रि‍क अडचणी असल्‍याचे सांगितले. या अडचणी तात्‍काळ दुर करून लवकरात लवकर पिक विमा वाटप करण्‍याचे निर्देश पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विमा कंपनीच्‍या क्षेत्रीय प्रबंधकांना दिले. त्‍यामुळे बुधवार पासून लातूर जिल्‍हयातील शेतक-यांना पिक विम्‍याचे वाटप सुरू होणार आहे.
   
पेरणी पूर्वी शेतक-यांना पिक विमा देवू असे आश्‍वासन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले होते.हा शब्‍द पालकमंत्र्यांनी पाळला आहे. पहिल्‍या टप्‍यात १५० कोटी रू.चे वाटप होणार आहे. उर्वरीत रक्‍कम दुस-या टप्‍यात वाटप केली जाणार आहे. पेरणीच्‍या कालावधीत पिक विम्‍याच्‍या रूपाने पैसा हाती येणार असल्‍यामुळे लातूर जिल्‍हयातील शेतक-यांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.

No comments:

Post a Comment