लाच घेताना दोघे लिपीक चतुर्भूज,

Monday, June 18, 2018


एसीबीची वसमत येथे कार्यवाही
हिंगोली / प्रतिनिधी

जीपीएफचे बील तयार करून मंजूर करून देण्यासाठी तसेच अर्जीत रजा मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून ३०० व ५०० रूपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने वसमत येथील पुर्णा पाटबंधारे विभागातील दोघा लिपीकांना सोमवारी (दि.१८) दुपारी ४.३० च्या सुमारास रंगेहात पकडले.

पुर्णा पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या तक्रारदार भुक्तर यांनी कार्यालयातील कनिष्ठ लिपीक मधुकर रामचंद्र वाढोणकर (५७) यांच्याकडे जीपीएफचे बील तयार करून मंजूर करून देण्यासाठी मदत करण्याकरीता ५०० रूपयांची लाचेची मागणी केली होती. त्यापैकी २०० रूपये यापुर्वीच वाढोणकर यांना देण्यात आले होते. उरलेले ३०० रूपयांची मागणी ते करीत होते. तसेच याच कार्यालयातील कनिष्ठ लिपीक माणिक नरसिंग पुरी (५४) हा तक्रारदाराची अर्जीत रजा मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून ३०० रूपये व त्यांच्या स्व्हिहस सिटला नॉमिनी म्हणून त्यांच्या पत्नीच्या नावात झालेली चूक दुरूस्त करून देण्यासाठी २०० रूपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीच्या कार्यालयात केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर वाढोणकर व पुरी यांनी लाच मागितल्याने सिद्ध झाल्याने एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि.१८) दुपारी ४.३० च्या सुमारास पुर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात मधुकर वाढोणकर यास ३०० रूपये तर माणिक पुरी याने ५०० रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात दोघा लिपीकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.

ही कार्यवाही एसीबीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील, शेख उमर, अभिमन्यू कांदे, संतोष दुमाने, विजयकुमार उपरे, महारूद्रा कबाडे, अविनाश किर्तनकार यांच्या पथकाने केली. 

No comments:

Post a Comment