नटवर्य श्रीराम गोजमगुंडे कलारत्न पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची निवड

Saturday, June 2, 2018
लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा  नटवर्य श्रीराम गोजमगुंडे कलारत्न पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारासाठी  दि. १९ डिसेंबर २०१७ च्या मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत   नटवर्य श्रीराम गोजमगुंडे  कलारत्न पुरस्कार समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीत स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, मनपा आयुक्त , सभागृह नेता तथा  रंगकर्मी ऍड. शैलेश गोजमगुंडे , गिरीश सहदेव, संजय अयाचित यांचा समावेश आहे. या समितीच्या दि. २३ फेब्रुवारी व २६ फेब्रुवारी रोजी अशोक गोविंदपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नटवर्य श्रीराम गोजमगुंडे कलारत्न पुरस्कारासाठी समितीसमोर आलेल्या नाना पाटेकर, अमोल पालेकर, मिलिंद जोशी  तीन नावांपैकी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावास सर्वानुमते संमती देण्यात आली. यंदाचा हा पुरस्कार लवकरच नाना पाटेकर यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी नानांची निवड करण्यात आल्याचे त्यांना  प्रत्यक्ष भेटून सांगण्यात आले असता आपण लवकरच या पुरस्कार सोहळ्यासाठी वेळ देऊ, असे त्यांनी सांगितले आहे.  लातूरचे पहिले अभिनेते , निर्माता - दिग्दर्शक दिवंगत श्रीराम गोजमगुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लातूर मनपाच्या वतीने देण्यात येणार्‍या या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख व मानपत्र असे आहे. या पुरस्कारासाठी नाना पाटेकर यांची निवड करण्यात आल्याने या पुरस्काराची उंची किती तरी पटीने  वाढल्याची प्रतिक्रिया कलाक्षेत्रातून व्यक्त केल्या जात आहेत.

No comments:

Post a Comment