खाद्य तेलावरील आयात शुल्क कमाल पातळीवर पाशा पटेल यांची मागणी मान्य
लातूर /प्रतिनिधी : 4000 रुपयांपर्यंत पोहोचलेले सोयाबीनचे दर तांत्रिक कारणांनी तीन हजार चारशे रुपयांपर्यंत कोसळले . यासंदर्भात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन केलेल्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या असून यामुळे खाद्य तेलावरील आयात शुल्क कमाल पातळी पर्यंत वाढविण्यात आले आहे . यामुळे बाजारपेठेत सोयाबीनचे दर पुन्हा एकदा चार हजार रुपयांच्या वर जाणार असल्याचा आत्मविश्वास पाशा पटेल यांनी व्यक्त केला आहे .
एप्रिल महिन्यात बाजारपेठेत सोयाबीनला चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता . परंतु तांत्रिक कारणांनी हा भाव कोसळला .सोयाबीन तीन हजार चारशे रुपयांपर्यंत खाली आले .यामुळे शेतकरी संकटात सापडला .ही बाब लक्षात घेऊन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आशा पटेल यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन 21 मे रोजी त्यांच्यासमोर मागण्यांचे सादरीकरण केले .दिनांक 22 मे रोजी केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल व सुरेश प्रभू तसेच केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या भेटी घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली .त्यासाठी काय करता येईल हे देखील सुचवले .
मंत्री महोदयांनी या सर्व बाबी केंद्र सरकारच्या सचिव गटासमोर सादर करण्याच्या सूचना त्यांना दिल्या .त्यानुसार दिनांक 24 मे रोजी त्यांनी सचिव गटाच्या बैठकीत हा विषय सादर केला .दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण विषयाची माहिती त्यांना दिली .त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पाशा पटेल यांच्या सूचनांवर अंमलबजावणी करण्याची विनंती केंद्र सरकारला केली होती .
या सर्व घडामोडी नंतर केंद्र सरकारने दिनांक 14 जुन रोजी पाशा पटेल यांनी सुचवलेल्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या .त्यानुसार खाद्यतेलावर आयातशुल्क कमाल पातळीपर्यंत अर्थात 45 टक्के एवढे वाढविण्यात आले आहे . मागच्या दहा महिन्यात चौथ्यान्दा केंद्र सरकारने आयात शुल्कात वाढ केली आहे .यापूर्वी 11 ऑगस्ट 2017 , 17 नोव्हेंबर 2017 , एक मार्च 2018 रोजी केंद्र सरकारने आयात शुल्कात वाढ केली होती . दिनांक 10 ऑगस्ट रोजी क्रूड पाम ऑईलवर 7.5 टक्के आयात शुल्क होते ते आता 44 टक्के झाले आहे . रिफाइंड पाम ऑईल वर असणारे पंधरा टक्के आयात शुल्क केंद्र सरकारने 54 टक्के केले आहे .क्रूड सूर्यफूल तेलावर असणारे 12.5 टक्के आयात शुल्क 35 टक्के तर रिफाईंड सुर्यफुल तेलावरील आयात शुल्क 45 टक्के करण्यात आले आहे . क्रूड सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 12.5 टक्के वरून 35 टक्के तर रिफाइंड सोयाबीन तेलावरील आयातशुल्क 20 टक्क्यावरून 45 टक्के करण्यात आले आहे .
गॅट करारानुसार जास्तीत जास्त 45 टक्के (फक्त सोयाबीन वर )आयात शुल्क लावता येते . त्यामुळे केंद्र सरकारने कमाल पातळीपर्यंत आयात शुल्क वाढविले आहे . मोहरीच्या तेलावर देखील 45 टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे .
केंद्र सरकारने आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाजारपेठेत तात्काळ त्याचे परिणाम दिसून येत आहेत .पहिल्याच दिवशी 3400 रुपये असणारा सोयाबीन चा दर ३६६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे .शासनाचा निर्णय झाल्यानंतर लातूर बाजरपेठेत कीर्ती ग्रूपने ३७०० रुपये भाव काढला असुन त्याची अंमलबजावणी केली आहे . थोड्याच दिवसात बाजार पेठेत हा दर ४ हजार रुपयांपेक्षा अधिक होण्याचा आत्मविश्वास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला आहे .दर वाढल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे .यासोबतच चांगला भाव मिळणार असल्याने सोयाबीनचा पेरा वाढणार आहे .

No comments:
Post a Comment