हिंगोली / प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे
गावातून शेतातील घरी जात असताना ओढ्याला आलेल्या पाण्यातून 18 वर्षीय तरूणी वाहून गेल्याची घटना हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथे 23 जून रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी तहसीलच्या पथकाने भेट दिली असून रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम सुरू होती. पण रात्री अंधारामुळे शोधमोहिमेला व्यत्यय आला आहे.
हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथील ध्रुपता बोडखे ही 18 वर्षीय तरूणी व तिची चुलत बहिण हिंगोली येथे एमएससीआयटीचे क्लास करून लोहगाव येथे दुपारी गेल्या. हे संपुर्ण कुटूंब शेतात राहत असल्याने लोहगाव वरून शेतातील घरी जात असताना वाटेत ओढा आहे. हा ओढा अरूंद असून पाण्याचा वेग जास्त असतो. या पाण्यातून मार्ग काढत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ध्रुपता बोडखे या पाण्यात वाहून गेली.
सोबतच्या चुलत बहिणीने झुडूपाला धरल्याने ती या घटनेतून वाचली. त्यानंतर तिने गावात येवून आरडा ओरड करत ही घटना गावकऱ्यांना सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी तहसीलदार व पथकाने भेट देवून पाहणी केली. त्यानंतर शोध मोहिम सुरू झाली.
या ओढ्याचा पुढील मार्ग काढत लोहगाववरून डिग्रस कऱ्हाळे, बोरजा, जडगाव या ठिकाणीही शोध घेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही छडा लागला नाही. रात्री अंधार झाल्याने या शोधमोहिमेत व्यत्यय निर्माण झाला होता. वाहून गेलेल्या मुलीला शोधण्याठी तब्बल तीन तास ही शोध मोहिम राबविण्यात आली. या शोधमोहिमेत ग्रामीण पोलीस ग्रामीण ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले आहेत. ध्रुपता बोडखे ही विद्यार्थीनी बारावीला लोहगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत होती.
नुकत्याच लागलेल्या बारावीच्या निकालात 35 विद्यार्थ्यांमधून तिने विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक मिळविला. पुढे नांदेड येथे जावून नीट परिक्षेचे क्लास लावून तिला मेडीकल क्षेत्रात करिअर करण्याची आवड असल्याची माहिती तिच्या शिक्षकांनी दिली.


No comments:
Post a Comment