हिंगोली / प्रतिनिधी
डोक्यात लोखंडी टॉमी मारून हत्या झाल्याची घटना घडल्याच्या तिसऱ्यांच दिवशी पोलिसांचा साक्षीदार असलेल्या एकाने आपल्या हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील राहत्या घरी शुक्रवार (दि२९) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. मिलिंद घुगे असे त्या मयत व्यक्तीचे नाव असून दोन दिवसापुर्वी कनेरगाव नाका येथे साहिल सिद्दीकी नावाच्या पंक्चर काढणाऱ्या दुकानदाराचा खून झाला असता पोलीस शोध घेतांना मिलिंद घुगेने यांनी पोलिसांना तपासात खुनाची महत्व पूर्ण माहिती दिली होती.
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे बुधवार दि २७ जूनला साहिल सिद्दीकी इसाक सिद्दीकी नावाच्या व्यक्तीचा डोक्यात टॉमी घालून खून झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जवळील दुकानदार यासह परिसरातील लोकांशी विचारपुस केली होती.संबंधीत घटनेच्या माहितीसाठी मिलिंद घुगे यांना ही विचारपूस झाली होती. मिलिंद घुगे यांनी या प्रकरणी पोलिसांना महत्वपुर्ण माहिती ही दिली होती. घुगे व इतर तपासाच्या माहितीच्या आधारे पोलिसांना मुळ आरोपी शोधण्यास मदत झाली आहे. यानंतर तीन दिवसानंतरच पोलीस तपासातील साक्षीदाराने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देवून पुढील तपास सुरू आहे. घुगे यांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे अद्याप समोर आले नसले तरी उलटसूलट चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी पोलिसांच्या वतीने तो या घटनेतील लिखित साक्षीदार नव्हता असे सांगण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment