लातुरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा घनकचरा व्यवस्थापनात राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्कार

Wednesday, March 6, 2019


लातूर / प्रतिनिधी :योग्य मार्गदर्शन ,नियोजन आणि सामुहिक प्रयत्नाची जोड मिळाली तर काय होवु शकते हे लातूर शहराने दाखवून दिले आहे एकेकाळी कचऱ्याचे आगर असणारे हे शहर राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार पटकावत आहे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची प्रेरणा आणि त्याला मिळालेली कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांची जोड यामुळेच ३ ते १० लाख लोकसंख्या असणाऱ्या महापालिकेच्या गटातून लातुरला उत्कृष्ट घनकचरा व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे .
काही वर्षांपूर्वी अस्वच्छ शहर असा लातुरचा नावलौकिक (?)होता . शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते . जागोजागी कचऱ्याचे ढिगारे पडलेले असायचे . यामुळे लातूर म्हणजे कचरा असे समीकरण बनले होते . पण राज्यात व महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर यात आमुलाग्र बदल झाला . त्यातही संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी हा प्रश्न अग्रक्रमावर घेतला जिल्हाधिकारी जी श्रीकांत ,पालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांचे त्यांना सहकार्य लाभले . यामुळे आज लातूरचे स्वछता राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे . 

पालकमंत्र्यानी राबवलेल्या इंद्रप्रस्थ जलभुमी अभियानातून पाणी वाचवण्यासोबतच वृक्षारोपण आणि स्वछतेचे महत्व पटवून सांगितले . जनतेनेही त्याला प्रतिसाद देत आपला परिसर आपणच स्वछ ठेवायचा असा कायदाच केला . 

लातुरचे जिल्हाधिकारी आणि तत्कालीन पालिका आयुक्त जी श्रीकांत यांना कचऱ्याच्या प्रश्नाबाबत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे रहावे लागले होते . त्यानीही पालकमंत्र्याना साथ देत स्वछ भारत अभियान जोमाने राबवले . नंतर कौस्तुभ दिवेगावकर पालिका आयुक्त म्हणून रुजू झाले उपायुक्त वसुधा फड यांनी त्यांना सहकार्य केले . फड या पूर्वी औसा येथे मुख्याधिकारी होत्या . त्यांच्या कार्यकाळात औशाला राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाला होता .

नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे व अजित पाटील कव्हेकर यांच्यासारख्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात स्वछता मोहिम चांगल्या पद्धतीने राबवली . पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनातून काम केले लातुरात प्लास्टिक पासुन कचऱ्याचा अभिनव प्रयोग नगरसेवकांनी केला . नेतृत्व चांगले असेल तर काय होते हे या निमित्ताने पहावयास मिळाले आहे .

आज कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा लातुरात आहे प्रभाग ५ ,प्रभाग १८ ,शासकीय कॉलनी ,फ्रूट मार्केट,विवेकानंद चौक ,भाजीपाला मार्केट येथे ओल्या कचऱ्यापासुन खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत शासकीय कॉलनीत सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू आहे . दररोज एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा लातुरात आहे सॅनिटरी नॅपकीन वर प्रक्रिया होतेय . अनेक कुटुंब घरातच कचरा कुजवतात . एवढेच नव्हे तर लातुरातील एका दांपत्याने आपल्या मुलीचे नाव स्वछता ठेवले आहे .
संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वामुळे हे सारे शक्य झाले आहे . लातुरचा झेंडा आज देशात फडकत आहे . त्याबद्दल दैनिक मराठवाडा नेताच्या वतीने पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर ,जिल्हाधिकारी जी श्रीकांत ,आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह या मोहिमेत सहभागी असणाऱ्या सर्वांचेच त्रिवार अभिनंदन !

No comments:

Post a Comment