नर्सीत अवतरली पंढरी वैष्णवांची मांदीयाळी, लाखोंच्या उपस्थितीत कलशारोहण

Friday, February 1, 2019
हिंगोली /ज्ञानेश्वर लोंढे 
संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांचे जन्मगाव असलेल्या नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 1 फेबु्रवारी रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त नर्सीत प्रतिपंढरपूर अवतरल्याचे चित्र दिसून येत होते. 
छाया निलेश गरवारे 

मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून संत नामदेव महाराजांच्या मंदिराचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. साडेसहा कोटी रूपये खर्चून जैसेल मेरे दगडात हे भव्य-दिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात संत नामदेवांची मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणानिमित्त 25 जानेवारीपासून रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांची संगीत रामायण कथा, दुपारी 3 ते 5 हभप जयवंत महाराज बोधले पंढरपूर यांनी संत नामदेव महाराज यांचे चरित्र सांगितले. सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार मंडळींनी हजेरी लावली. 31 जानेवारी रोजी नर्सी नामदेव नगरीतून ही कलश मिरवणूक पार पडली. त्यानंतर 1 फेबु्रवारी रोजी सकाळी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पंचधातूंपासून बनविण्यात आलेला 15 लाख रूपये किमतीचा 8 फुट उंच कळस मंदिरावर बसविण्यात आला. 

 लोकेश स्वामी महाराज पंढरपूर, सदानंद महाराज श्रृंगारेश्‍वर, कमलदास महाराज खाकीबाबा संस्थान, गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत, आत्मानंद महाराज गांगलवाडी, लोकेश चैतन्य महाराज, आ.तान्हाजीराव मुटकुळे, मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्‍वर शिंदे यांनी विधीवत पुजा केली. या कलशारोहणाच्या कार्यक्रमानंतर रामभाऊ महाराज राऊत यांचे काल्याचे किर्तन पार पडले. त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे लाखो जनसमुदाय असूनही मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने शिस्तबद्ध व सुक्ष्मनियोजन करण्यात आले होते. 

जेवणाच्या पंगतींसाठी सर्कलनिहाय स्वयंसेवकांची नियुक्ती केलेली असल्याने महाप्रसादाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. या कलशारोहण कार्यक्रमाला महाराष्ट्रासह पंजाब व शेजारील राज्यातील लाखो भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. नर्सीत या कलशारोहण सोहळ्यानिमित्त प्रतिपंढरपूर अवतरल्याचे उपस्थितांनी अनुभवले. या मुर्तीप्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळ्यासाठी आ.तान्हाजीराव मुटकुळे, मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्‍वर शिंदे, काशिराम महाराज इडोळीकर, दाजीबा पाटील, शाहूराव देशमुख, नारायण देशमुख, डिगांबर देशमुख, कुंडलिकराव घुले, उतमराव लाभाटे, नारायण खेडेकर, गिरीष वरूडकर, माधव पवार, त्र्यंबकराव तावरे, दादाराव महाराज डिग्रसकर, मदन लोथे, किसनराव गावंडे, पानबुडे गुरूजी, डॉ. रमेश शिंदे यांच्यासह मंदिर जीर्णोद्धार समिती, संत नामदेव मंदिर संस्थान, नर्सी ग्रामस्थ व हजारो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. 



10 हजार स्वयंसेवक 
मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी गेल्या महिनाभरापासून गाव पातळीवर जावून स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली होती. गेल्या सात दिवसांपासून हजारो हात या धार्मिक कार्यक्रमासाठी झटत होते. 10 हजार स्वयंसेवकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला. 
लाखोंची गर्दी शांततेत 
कलशारोहणाचा कार्यक्रम असल्याने सकाळपासूनच 1 लाखावर भाविकांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. एवढा मोठा अभूतपूर्व जनसमुदाय असूनही संत नामदेवांच्या दरबारात कोणताही अनूचित प्रकार घडला नाही हे विशेष. सर्वत्र स्वयंशिस्त व शांततेचा अनुभव या कलशारोहणातून आला. 

2 किलोमीटर रहदारी 
मंदिर जीर्णोद्धार समितीने चार ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस प्रशासन व स्वयंसेवकांच्या मदतीने हे नियोजन करण्यात आले. कार्यक्रम झाल्यानंतर हिंगेालीकडे व सेनगावकडे जाणार्‍या दुतर्फा दोन ते अडीच किलोमीटर रहदारी ठप्प झाली होती. याही परिस्थितीत ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाने भाविकांना वाट मोकळी करून दिली. सर्वच पार्किंग हाऊसफुल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

63 गोण्यांचा बुंदीचा महाप्रसाद 
कलशारोहण सोहळ्याला येणार्‍या भाविकांची संख्या लक्षात घेता 63 क्विंटल साखरेपासून बुंदीचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून मंदिर समितीच्या वतीने अल्पदरात मिनरल वॉटर पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

आ.मुटकुळेंनी सांभाळली संचलनाची जबाबदारी...
नर्सी नामदेव येथे प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित झाला होता. अनेकजण ध्वक्षेपनातून या गर्दीला सूचना देण्यासाठी विनंती करीत होते. त्यातच आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी माईक हातात घेत महिलांनी डाव्या हाताला पंगती धराव्यात.. कृपया शांतता पाळा... पावती घेतल्याशिवाय कुणाच्या हातात देणगी देवू नका...वाढेकऱ्यांनो सर्व पंगतींना काळजीपूर्वक वाढ करा...सर्व भाविकांनी या ठिकाणी पोटभर जेवण करावे असे आवाहन तब्बल चार ते पाच तास केले. 


पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त 
कलशारोहण सोहळ्याला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दुल गणी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये 2 पोलीस निरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 5 पोलीस उपनिरीक्षक, 45 पोलीस कर्मचारी, 10 वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी व 1 आरपीसी प्लाटून असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांनी दिली.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 7083550505 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment